निलंबित पडारेंच्या कपाटांचा पंचनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:19 AM2017-12-13T00:19:31+5:302017-12-13T00:20:01+5:30
प्रशांत देसाई ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : जिल्हा परिषद आरोग्य विभागातील सहायक प्रशासन अधिकारी राजन पडारे हे निलंबनानंतर त्यांच्याकडील कपाटाच्या चाब्या न दिल्याने न्यायालयीन कामे प्रलंबित होती. मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यां यांच्या आदेशानुसार मंगळवारला दुपारी पडारे यांच्या तीन कपाटांचे कुलूप तोडून पंचनामा करण्यात आला. या कारवाईने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गारगोटी येथील प्रशिक्षणासाठी पडारे यांची निवड झाली होती. मात्र प्रशिक्षणाला जाणे त्यांनी टाळले. याप्रकरणी सीईओ मनोजकुमार सुर्यवंशी यांनी पडारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित केले. निलंबनानंतर पडारे यांची लाखांदूर पंचायत समितीला बदली करण्यात आली. निलंबन व बदलीचे आदेश पडारे यांना २४ नोव्हेंबरला बजावून त्यांना मध्यान्हानंतर आरोग्य विभागातून कार्यमुक्त केले. मात्र बदलीस्थळी न जाता पडारे यांनी त्यांच्याकडील शासकीय दस्ताऐवज असलेल्या तीन कपाटांच्या चाब्याही हस्तांतरीत केलेल्या नव्हत्या. पडारे यांच्याकडे न्यायालयीन प्रक्रियेचा कार्यभार होता. यामुळे न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी कपाटातील कागदपत्रे आवश्यक होते. ते मिळण्यासाठी आरोग्य विभागाने मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे मागणी केली. त्यावर सीईओ सुर्यवंशी यांनी पडारे यांच्या ताब्यातील कपाटाचे कुलूप तोडून पंचनामा करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाºयांना दिले. त्यानंतर आरोग्य विभागाच्या सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एम. मोटघरे, प्रशासन अधिकारी एम.डी. केवट, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आर.बी. मडकाम, अवैद्यकीय पर्यवेक्षक एम.टी. श्रीनाथ, कनिष्ठ सहायक ए.ए. मशीदकर, कनिष्ठ सहायक लेखा ए.एम. तिडके यांच्या समक्ष पंचनामा केला.
पहिलीच कारवाई
एखादा कर्मचारी एखाद्या प्रकरणात निलंबित झाल्यास त्याच्याकडील अधिकार काढून त्याचा प्रभार अन्य कर्मचाºयाकडे सोपविण्यात येतो. मात्र पडारे यांनी निलंबनानंतर प्रभार व कपाटाच्या चाब्या दुसऱ्यांकडे सोपविल्या नाही. त्यामुळे पंचनामा करून कपाटाचे कुलूप तोडावे लागल्याची नामुष्की आरोग्य विभागावर ओढवली. जिल्हा परिषद प्रशासनात अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच करण्यात आली. या कारवाईची आज दिवसभर कर्मचाºयांमध्ये चर्चा होती.
तीन कपाटांचा पंचनामा
मंगळवारला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पडारे यांच्या ताब्यातील तीन कपाटाचे कुलूप तोडण्यात आले. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. पडारे यांच्या एकाच कपाटातील ७० फाईल्सची माहिती तपासून त्याची नोंद करण्यात आली.
निलंबनाबाबत चुकीचे अपील
मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर पडारे यांनी आयुक्तांकडे दाद न मागता लाखांदूर येथे केलेल्या बदली प्रकरणी न्यायालयात दाद मागितली. हा प्रकार जिल्हा परिषद अधिनियमाचा भंग करणारा आहे. पडारे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
मुख्यद्वाराचे कुलूप बदलले
पडारे यांच्याकडून आरोग्य विभागात बकुठलाही उपदव्याप होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने कक्षाच्या प्रवेशद्वाराचे जुने कुलूप बदलवून पडारे यांच्या कक्षाच्या प्रवेशावर निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला आहे.