वनस्पतींची लागवड व संवर्धन काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:15 AM2018-03-20T00:15:28+5:302018-03-20T00:15:28+5:30
परिसरात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यापैकी फक्त २० टक्केच माहिती असून त्यावर संशोधन सुरू आहे. अद्यापही ८० टक्के संशोधन शिल्लक आहे. मानवी जीवनाला ३८० औषधी वनस्पतींची गरज आहे. ज्यावर अजुनही संशोधन करू शकलो नाही.
आॅनलाईन लोकमत
साकोली : परिसरात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत. यापैकी फक्त २० टक्केच माहिती असून त्यावर संशोधन सुरू आहे. अद्यापही ८० टक्के संशोधन शिल्लक आहे. मानवी जीवनाला ३८० औषधी वनस्पतींची गरज आहे. ज्यावर अजुनही संशोधन करू शकलो नाही. औषधी वनस्पतींची लागवड करून त्यांचे संवर्धन करणे आणि त्यातून व्यवसाय करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन गुरू घासीदास विद्यापीठ बिलासपूर (छत्तीसगड) येथील प्रोफेसर डॉ. अश्विनीकुमार दिक्षित यांनी केले.
ते वैनगंगा बहुउद्देशिय विकास संस्था द्वारा संचालित बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी येथे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या सेमिनारचे उद्घाटन डॉ. अश्विनी कुमार दिक्षीत यांनी केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे एलएमसी सदस्य लोकानंद नवखरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोधर गौपाले, सेमिनारचे मुख्य आयोजन प्रा. डॉ. सलिम फारूखी सहआयोजक प्रा. टी.पी. निंबेकर उपस्थित होते.
डॉ. दिक्षित म्हणाले, याआधी ग्रामीण भागात हकीम औषधी वनस्पती गोळा करून विविध आजारावर उपचार करीत आणि त्यातून रुग्ण बरा होत असे. कॅन्सरसारख्या आजारावर औषधी वनस्पती उपयुक्त ठरत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. छत्तीसगड सारख्या भागात आदीवासी जनता औषधी वनस्पतीमधूनच आजारावर उपचार करीत आहे. परिणामी अशा औषधींचा शोध घेणे आवश्यक ठरते. व्यवसाय विकासाचे तंत्रशिक्षण आणि औषधी वनस्पतींची लागवड व त्यांचे संवर्धन हा एकदिवसीय राष्ट्रीय सेमिनारचा विषय होता.
नागपूर येथील डॉ राजेंद्र काळे, नागपूर विद्यापीठ अंतर्गत फार्मासटीकल सायन्स विभागाचे डॉ. प्रकाश इटनेकर, अशोक जोनवाल, डॉ. शिशुपाल बोदेले, प्राचार्य सचिन लोहे, कामठी महाविद्यालयाचे डॉ. राजेश लोहिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. औषधी वनस्पतींचा शोध, त्यावरील संशोधन, त्यातून निर्माण होणारे औषध व त्याची उपयुक्तता, औषधी वनस्पतींच्या लागवडीमधून तयार होणारा व्यवसाय, त्यातून मिळणारी मिळकत व सरतेशेवटी या क्षेत्राचे महत्व अशा अनेक विषयावर या चर्चासत्रात उहापोह करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे ‘सोव्हीनियर’ या शोध प्रबंध पुस्तकाचे विमोचन करण्यात आले तर ‘जी पॅट’ परिक्षेत यश मिळविणाऱ्या प्रणय कोरे आणि वनश्री तवाडे या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
बाजीरावजी करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी वतीने आयोजित राष्ट्रीय सेमिनारमध्ये कमला नेहरू कॉलेज आॅफ फार्मसी नागपूर, मनोहरभाई पटेल कॉलेज आॅफ फार्मसी गोंदिया, गुरूनानक कॉलेज आॅफ फार्मसी नागपूर, किशोरीताई भोयर कॉलेज आॅफ फार्मसी कामठी आणि बाजीराव करंजेकर कॉलेज आॅफ फार्मसी साकोली इत्यादी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रचंड संख्येत सहभाग नोंदविला.
चर्चासत्राच्या समारोपीय कार्यक्रम, कामठी फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. राजेश लोहिया यांच्या अध्यक्षतेत पार पडला. अतिथी म्हणून डॉ. राजेंद्र काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दामोधर गौपाले, सेमिनारचे मुख्य आयोजक डॉ. सलिम फारूखी, सहआयोजक तुळसीदास निंबेकर हे होते. संचालन प्रा अनिल साव, प्रस्ताविक प्रा. डॉ. डी.सी. गौपाले, सेमिनार चर्चासत्राचे संचालन काजल लिल्हारे, प्रा. पूजा हेमणे, समारोपीय कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. टी.पी. निंबेकर यांनी केले. एक दिवसीय राष्ट्रीय सेमिनार कार्यक्रमासाठी प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी प्रतिनिधीनी सहकार्य केले.