वीज तारांच्या खाली वृक्षारोपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:38 AM2021-08-19T04:38:45+5:302021-08-19T04:38:45+5:30
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण केले जाते. शासनासह खाजगी स्तरावर वृक्षारोपणाला मोठे महत्त्व आले आहे. मात्र, हे वृक्षारोपण करताना इतर ...
पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण केले जाते. शासनासह खाजगी स्तरावर वृक्षारोपणाला मोठे महत्त्व आले आहे. मात्र, हे वृक्षारोपण करताना इतर काही गोष्टींचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो. खाजगी स्तरावरील वृक्षारोपणात स्वतःचे अधिकार असल्याने स्वतःच्या मालकीत आपण आपल्या अधिकाराचा वापर करून वृक्षारोपण करू शकतो; परंतु शासकीय योजनेतून शासकीय जागेवर वृक्षारोपण करताना काळजी घेणे नितांत गरजेचे असते. मात्र, सामाजिक वनीकरण विभाग लाखनीच्या वतीने किटाडी ते सायगाव फाटा या रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या वृक्षारोपणात नेमकी वीज तारांच्या अगदी खाली वृक्षारोपण केलेले आहे. यामुळे पाच वर्षांत वृक्षवाढ अपेक्षित आहे. तेव्हा महावितरणमार्फत त्यांची कटाई केली जाईल किंवा छटाई केली जाईल. कदाचित एखादा नागरिक वीज तारांच्या संपर्कात येऊन धोकासुद्धा अपेक्षित आहे. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा झालेले वृक्षारोपण योग्य आहे काय, असा प्रश्न लाखनी तालुक्यातील मांगली येथील उद्धव मासूरकर यांनी केला आहे.
कोट
वृक्षारोपणाच्या पूर्वी खड्डे खोदणाऱ्या मजुरांना खड्डे चुकीचे असल्याचे सांगितलेले होते. खड्ड्याची खोली व रुंदी अपेक्षित नसून विजेच्या तारांच्या खाली वृक्षारोपण चुकीचे आहे. भविष्याचा विचार वन विभागाने केला नाही. खर्च लावून वृक्षारोपण करणे व मोठी झाल्यावर त्यांची कत्तल करणे हे योग्य आहे काय? यात जनतेच्या पैशाचा दुरुपयोग नाही काय? वन विभागाने वेळीच योग्य ती काळजी घेणे गरजेचे होते.
उद्धव मासुरकर, तक्रारदार, मांगली
कोट
संबंधित तक्रारीची दखल घेऊन वृक्षारोपण झालेल्या ठिकाणची चौकशी केली जाईल. नेमके काय प्रकार आहे ते अभ्यासून सुधारणा केली जाईल.
प्रमोद फुले, क्षेत्र सहायक, सामाजिक वनीकरण विभाग, लाखनी