चारगाव रेती घाटावर यंत्राने रेती उत्खनन सुरु
By admin | Published: February 11, 2017 12:22 AM2017-02-11T00:22:08+5:302017-02-11T00:22:08+5:30
लोकप्रतिनिधी मुंबईला गेल्यानंतर दोन दिवसांपासून चारगाव (दे.) रेती घाटातून नियमबाह्यरीत्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु करण्यात आले.
तहसीलदार म्हणतात जेसीबी नव्हती : महसूल प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
तुमसर : लोकप्रतिनिधी मुंबईला गेल्यानंतर दोन दिवसांपासून चारगाव (दे.) रेती घाटातून नियमबाह्यरीत्या जेसीबीने रेतीचे उत्खनन सुरु करण्यात आले. शुक्रवारी तुमसरच्या तहसीलदारांनी चारगाव रेती घाटावर भेट दिली. परंतु जेसीबी तेथून गायब करण्यात आली. नदी पात्रात १० ते १२ जण मजूर होते. नदी घाटाजवळ १० ते १२ ट्रक रिकामे उभे होते हे विशेष.
चार दिवसांपर्वूी आमदार चरण वाघमारे यांनी ब्राम्हणी रेती घाटाची पाहणी कारवाईचे निर्देश तहसीलदारांना दिले होते. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. मागील सहा दिवसांपासून येथे रेतीचे उत्खनन बंद आहे. गुरुवारी आमदार चरण वाघमारे मुंबईला रवाना झाले. तेव्हापासून चारगाव रेती घाटावर जेसीबीने रेती उत्खनन सुरु आहे. गुरुवारी व शुक्रवारी येथे रेती उत्खनन सुरु होते.
शुक्रवारी तहसीलदार डी. टी. सोनवाने, नायब तहसीलदार एन. पी. गौड यांनी चारगाव येथील रेती घाटाला भेट दिली. तेव्हा जेसीबी तेथून गायब होती. नदी पात्रात केवळ मजूर उपस्थित होते. रेती कंत्राटदारांची येथे एक साखळी आहे.
महसूल कर्मचारी अधिकारी कार्यालयातून निघून कुठे जातात याची खडा न खडा माहिती संबंधित रेती घाटावर पोहचविण्याचे काम या साखळीतील सदस्य करतात. त्यामुळे कारवाई होत नाही.
चारगाव रेती घाटातून तात्काळ जेसीबी मशीन कशा गायब झाल्या हा संशोधनाचा विषय आहे. (तालुका प्रतिनिधी)
पर्यावरणाला धोका
जेसीबी, पोकलँन्ड मशीनने रेती उत्खननाला पर्यावरण व भूजल विभागाने बंदी घातली आहे. या दोन्ही विभागाची परवानगी असेल तरच नदी पात्रातून यंत्राने रेती उत्खनन करता येते. तुमसर व मोहाडी तालुक्यातील एकाही रेती घाटावरुन यंत्राने रेती उत्खननाची परवानगी नाही अशी माहिती आहे.
यंत्रावर कारवाईचा अधिकार नाही
नदी पात्रातून यंत्राने रेती उत्खनन सुरु असले तर महसूल प्रशासन केवळ जप्ती करु शकते. दंड आकारण्याचा अधिकार केवळ जिल्हा खनिकर्म विभागाला आहे. अशी माहिती आहे. तुमसर तालुक्यातील रेती घाटातून रेती उत्खनन करणारे, वाहतूक करणाऱ्यांचे रॅकेट सक्रीय आहे. या रॅकेटला कुणाचा आशिर्वाद आहे हा मुख्य प्रश्न आहे.
शुक्रवारी दूपारी चारगाव(दे.) रेती घाटावर भेट दिली. तिथे जेसीबी नव्हती. नदी काठावर केवळ रिकामे ६ ते ७ ट्रक उभे होते. रेती उत्खनन करणाऱ्यांचे खबरी नेटवर्क आहे. ते समूळ नष्ट करणे गरजेचे आहे.
डी. टी. सोनवाने,
तहसिलदार तुमसर