पट्टा पद्धतीने उन्हाळी धानाची रोवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:51+5:302021-02-05T08:37:51+5:30
२८लोक २६ के पालांदूर : खरीप हंगामात तुडतुडा मावा , महापुराने धानाचा हंगाम सुमार संकटात आला. अर्ध्या उत्पन्नावर समाधान ...
२८लोक २६ के
पालांदूर : खरीप हंगामात तुडतुडा मावा , महापुराने धानाचा हंगाम सुमार संकटात आला. अर्ध्या उत्पन्नावर समाधान ठेवावे लागले. ती भरपाई काढण्याच्या अपेक्षेने उन्हाळी हंगामात धान उत्पादक शेतकरी सरसावलेला आहे. पट्टा पद्धतीचा अवलंब करीत रो वणी सरळ रेषेत दोरीच्या आधाराने करीत आहे.
चुलबंद खोऱ्यात उन्हाळी रोवणीचा हंगाम धडाक्यात सुरू झालेला आहे. सुमारे ११९० हेक्टरवर रोवणीचे नियोजन केले आहे.
पट्टा पद्धत अवलंबन करिता तालुका कृषी अधिकारी पद्माकर गीदमारे, मंडल कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, कृषी सहाय्यक चुडामन नंदनवार, कृषी मित्र शरद निखाडे, प्रशांत जांभुळकर, नरेंद्र खंडाईत आदींच्या मार्गदर्शनात चुलबंद खोऱ्यात पट्टा पद्धत रुढ होत आहे.
पारंपारिक पद्धतीत काही सुधारणा अवलंबत कृषी विभागाच्या मार्गदर्शनात चुलबंद खोऱ्यात उन्हाळी धानाचा हंगाम राबविला जात आहे. पालांदूर मंडल कृषी कार्यालय अंतर्गत सुमारे ५२ गावात ११९० हेक्टरवर उन्हाळी धानाचा हंगाम नियोजित आहे. हुंडा पद्धत २५०० प्रति एकर दराने रोवणी सुरू आहे. मजूर पद्धतीने १३० रुपये रोजाने महिला मजुरांच्या आधाराने रोवणी केले जात आहे. डिसेंबर-जानेवारीमध्ये नर्सरी तयार केलेल्या शेतकऱ्यांनी रोवणीचा हंगाम सुरू केलेला आहे. कडधान्य काढणे व रोवणी एकाचवेळी आल्याने मजूर टंचाईचा सामना बळीराजाला करावा लागत आहे.
इंधन दरवाढीचा फटका
शेतीकरिता ट्रॅक्टर हा वरदान ठरलेला आहे
इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांना भाड्यातसुद्धा वाढ करणे साहजिकच आहे. दर तासाला शंभर रुपयाची वाढ ट्रॅक्टर मालकाने केली आहे. यामुळे उत्पादन खर्चात नक्कीच वाढ झालेली आहे.
पट्टा पद्धतीचे फायदे
पट्टा पद्धतीमुळे कीड-रोग नियंत्रणाकरिता शून्य खर्चातील नैसर्गिक उपाययोजना अत्यंत लाभदायी ठरलेली आहे. या पद्धतीमुळे धानाच्या बुंध्याला सूर्यप्रकाश स्पष्ट मिळत असतो. खत घालने, तण काढणे, फवारणी करणे सोपे जाते. कीड-रोग अभ्यासाकरिता उभ्या धानात नुकसान न होता अभ्यास करायला वाव मिळतो. रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता पट्टा पद्धतीचा अपेक्षित लाभ होतो. दहा ओळीनंतर एक फुटाचा पट्टा सोडून नियमित लागवड अपेक्षित आहे. फार पूर्वीसुद्धा दोरीच्या आधाराने रोवणीकरिता धानाची शेती केली जायची. मात्र मधल्या काळात पुन्हा ती पद्धत दुर्मिळ होत गेली. परंतु आता कृषी विभागाच्या मार्गदर्शनात सरळ दोरीचा रेषेत पट्टा पद्धतीचे आधाराने दोन्ही हंगामात धानाची रोवणी केली जात आहे. याकरिता कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मौलिक ठरत आहे.
किमान महिनाभर रोवणीत पाणी अत्यल्प ठेवा
रोहिणी नंतर किमान महिनाभर बांध्यात अधिक पाणी भरून ठेवू नये. अधिक पाण्यामुळे धानाच्या बुंध्याला अपेक्षित फुटवे येत नाही. फुटवे अधिक न आल्यास उत्पन्नात अपेक्षित भर पडत नाही. तसेच रोगराईकरिता आमंत्रण येते. त्यामुळे अधिक फुटल्याकरिता व रोगराईच्या नियंत्रणाकरिता किमान महिनाभर तरी धानाच्या बांधानात पाणी साचून ठेवू नये.
कृषी अधिकाऱ्यांच्या अभ्यासात उन्हाळी धानाचा हंगाम कसलेला आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात पट्टा पद्धतीचा अवलंब करीत रोवणी केली आहे. इतरही शेतकऱ्यांनी सुधारित पद्धतीत धान लागवड करून नवीन अभ्यास स्वीकारावा.
गोकुळ राऊत पालांदूर.