लाखांदूर तालुक्यातील ६,९५९ हेक्टरवर उन्हाळी धान रोवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:14+5:302021-04-04T04:36:14+5:30
लाखांदूर : इटियाडोह धरण व कृषी वीजपंप सिंचन सुविधा अंतर्गत लाखांदूर तालुक्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात सुमारे ६,९५९ हेक्टर क्षेत्रात ...
लाखांदूर : इटियाडोह धरण व कृषी वीजपंप सिंचन सुविधा अंतर्गत लाखांदूर तालुक्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात सुमारे ६,९५९ हेक्टर क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे, तर ६३ हेक्टर क्षेत्रात अन्य उन्हाळी पिकांची लागवड करण्यात आल्याची माहिती तालुका कृषी विभागांतर्गत देण्यात आली आहे.
गत खरीप हंगामात तालुक्यात महापूर, कीडरोग आणि परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उत्पादनात घट होऊन आणेवारीतदेखील कमालीची घट झाली आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात दिसून येत आहे. या संकटावर मात करण्यासाठी तालुक्यात धान पिकासह अन्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. इटियाडोह धरण व कृषी वीजपंप सिंचन सुविधेमुळे लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. उन्हाळी हंगामात तालुक्यातील सुमारे ६९५९ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची रोवणी पूर्ण झाली आहे. तीळ ७ हेक्टर, भाजीपाला १२९ हेक्टर , चारापिके १९ हेक्टर व मूग ४ हेक्टर आदी पिकांची लागवड करण्यात आली आहे.
दरम्यान, तालुक्यात उन्हाळी हंगामात लागवडीखालील शेतपिकांवर सद्य:स्थितीत रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत नसून पीक परिस्थिती समाधानकारक असल्याची माहिती देण्यात आली आहे.