लागवडीच्या वृक्षांचे होणार दर महिन्याला मोजमाप
By Admin | Published: July 10, 2017 12:18 AM2017-07-10T00:18:46+5:302017-07-10T00:18:46+5:30
अनेकांकडून वृक्ष लागवडीचे केवळ सोपस्कर पार पाडले जातात;..
शाळास्तरावर विद्यार्थ्यांना पारितोषिक : तालुका, जिल्हास्तरावरील शाळांना पुरस्कार, १० महिन्यानंतर शाळास्तरावर स्पर्धा
प्रशांत देसाई। लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अनेकांकडून वृक्ष लागवडीचे केवळ सोपस्कर पार पाडले जातात; मात्र त्यांच्या संवर्धनाकडे अनेकवेळा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. त्यामुळे लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगळी शक्कल लढविली आहे. यात उत्कृष्ट काम करणाऱ्या विद्यार्थी, शाळांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाच्या शाळेला २५ हजार रूपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन पुरस्कृत करण्यात येणार आहे. सोबतच शाळांनाही तालुका व जिल्हास्तरावरील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्यात चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट्य राज्याने लिलया पार केले. या वृक्ष लागवडीसाठी राज्यातील प्रत्येक विभागासह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षवेधी होता. वृक्ष लागवडीसाठी भंडारा जिल्हाही कुठेही मागे नाही. दिलेले उद्दिष्ट्यपूर्ती करून नवा विक्रम प्रस्तापित करण्याकडे जिल्ह्याची वाटचाल आहे. यात जिल्ह्यातील सर्व शाळांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्यांचे योगदान दिलेले आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ व स्थानिक प्रशासन, निमशासकीय संस्था, संघटनांनी वृक्ष लागवड केली. वृक्ष लागवड करायची म्हणून अनेकांनी सहभाग घेतला. मात्र, लागवड केलेल्या वृक्षांची खरोखरचं जोपासणा होते का? हा खरा संशोधनाचा विषय आहे.
वृक्ष लागवड करणे व वाढविणे तसेच भविष्यात त्याचा सर्वांना उपयोग होण्यासाठी त्याचे संवर्धन व जोपासणा करणे महत्वाचे आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने यावर्षी लावलेले वृक्ष जोपासण्यासाठी नाविण्यपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. शालेय पातळीवर विद्यार्थ्यांच्या मदतीने वृक्ष लागवड व संवर्धन करण्यावर भर दिला आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्यांनी किमान दोन वृक्ष लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी शाळा, तालुका व जिल्हा पातळीवर बक्षिस देण्यात येईल. विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष संवर्धनाची आवड निर्माण होऊन त्यांचे जतन केले जाईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
निकष व मार्गदर्शन
प्रत्येक शाळा पातळीवर सर्वोत्कृष्ठ वृक्ष संगोपणासाठी पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. गुणांकन निकषाचे मार्गदर्शन जिल्हास्तरावरून मिळेल. निकष अंतिम करण्याचा अधिकार मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांचे राहणार आहे.
वृक्षांची अशी होईल नोंद
लागवड केलेल्या वृक्षांची प्रत्येक महिन्याला उंची, घेर व सद्यस्थितीबाबत मोजमाप घेऊन टिपण केले जाणार आहे. १० महिन्यानंतर वृक्षांच्या संगोपनाबाबत प्रत्येक शाळेत वर्गनिहाय व त्यानंतर शाळा पातळीवर विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा घेण्यात येणार आहे.
या विद्यार्थ्यांचा सहभाग
इयत्ता ५ ते ११ वी च्या विद्यार्थ्यांचा या योजनेत सहभाग राहिल. शाळा किंवा घरी लावण्यासाठी वनविभागाच्या वतीने दिलेल्या वृक्षांची नोंद यासाठी करण्यात येत आहे. रोपांची लागवड झाल्यानंतर रोप संवर्धनाची जबाबदारी संबंधीत विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या वर्ग शिक्षकांची राहिल.
पुरस्काराचे स्वरूप
प्रत्येक शाळेत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ५०० व ३०० रूपये रोख व प्रमाणपत्र दिले जाईल. तालुकास्तरावरील प्रथम शाळेला १० हजार रूपये रोख व प्रमाणपत्र. तर जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या शाळेला २५ हजार रूपये रोख व प्रमाणपत्र देणार आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी हा महत्वाचा पायंडा आहे. वृक्षांचे संगोपन करण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी संस्था, संघटना, नागरिक प्रयत्नरत आहेत. यातून भंडारा जिल्हा निसर्गसंपन्न होण्यास मदत होईल.
- जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. भंडारा.