जलीकट्टूप्रमाणे शंकरपटाला मंजुरी द्या!
By admin | Published: January 24, 2017 12:30 AM2017-01-24T00:30:47+5:302017-01-24T00:30:47+5:30
तामीळनाडू राज्यात तेथील लोकभावनेचा आदर करीत पारंपरिक जलीकट्टू स्पर्धेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.
नाना पटोले : पंतप्रधानांना निवेदन
भंडारा : तामीळनाडू राज्यात तेथील लोकभावनेचा आदर करीत पारंपरिक जलीकट्टू स्पर्धेला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यायाने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांच्या भावनांचा आदर करीत शंकरपटांना मंजुरी देण्यात यावी अशी मागणी खा.नाना पटोले यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
शंकरपटाबाबत बोलताना खा.पटोले म्हणाले, पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना झाडीपट्टी संबोधले जाते. धान उत्पादक असलेल्या या जिल्ह्यात दिवाळीमध्ये धानपीक हातात येते. त्यानंतर शंकरपटांना सुरूवात होते. या शंकरपटाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी वाढायची. त्यातच सोयरीक जुळायची. मुलामुलींचे लग्न व्हायचे. परंतु मधल्या काळात बैलांवर अत्याचार होत असल्याच्या कारणावरून शंकरपटांवर बंदी घालण्यात आली. खरेतर झाडीपट्टी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही आमचा शेतकरी बैलांना जिवापाड जपत असतो. बैलांची काळजी घेत त्यांना तंदुरूस्त ठेवतो. या सुदृढ बैलांना शर्यतीसाठी तयार करीत असतो. शंकरपटाच्या माध्यमातून त्या-त्या गावात उत्साहाचे वातावरण असते. तामीळनाडू राज्यात जलीकट्टू हा सुद्धा तेथील परंपरागत प्रकार आहे. केंद्र सरकारने जलीकट्टूला दिलेल्या मंजुरीप्रमाणे शंकरपटालाही मंजुरी द्यावी, या आशयाचे निवेदन आपण प्रधानमंत्र्यांना दिल्याचे खा.पटोले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)