हिवरा-हत्तीडोई पांदण रस्त्याची दुर्दशा
By admin | Published: March 31, 2016 12:58 AM2016-03-31T00:58:29+5:302016-03-31T00:58:29+5:30
नागरिकांची गैरसोय : प्रशासन लक्ष देणार काय?
भंडारा : येथून १५ कि़मी. अंतरावर हत्तीडोई मोहदुरा नावाचे गाव असून हे गाव नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील गाव आहे. हत्तीडोईला लागून नागपूर जिल्ह्यात हिवरा आदी गावे असून येथील शालेय विद्यार्थी शिक्षणासाठी हिवरा-अदासा-हत्तीडोईमार्गे मोहदुरा शाळेत जातात. परंतु ज्या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या पांदण रस्त्याने हे विद्यार्थी जाणे येणे करतात. त्या पांदण रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असून विद्यार्थ्यांसह नागरिकांना या पांदण रस्त्यावरून जाणे येणे कठीण झाले आहे.
त्या गावात ग्रामपंचायत कार्यालय असून येथे हिरवी मिरचीची मोठी बाजारपेठ असून येथील हिरवी मिरची ट्रकद्वारे देशाची राजधानी दिल्ली येथे पाठविण्यात येते. एकंदरीत हत्तीडोई परिसरात हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असते. परिणामी शेतात जाण्यासाठी रहदारी मोठ्या प्रमाणात असते.
हिवरा-हत्तीडोई पांदण रस्ता जवळपास दोन कि.मी. अंतराचा असून मागील कित्येक वर्षापासून या रस्त्याचा काम रखडला आहे.
लोकप्रतिनिधी व शासनाच्या उदासीन धोरणामुळे या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून शालेय विद्यार्थ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहे.
भंडारा तालुक्यातील मोहदुरा येथे इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षणाची सोय असून हिवरा-अदासा-हत्तीडोई मार्गे मोहदुरा येथे शालेय विद्यार्थी जाणे येणे करतात.
या दोन जिल्ह्यांना जोडणारा दुसरा एक नहराचा रस्ता असून त्यांचा अंतर जवळपास ८ ते १० कि़मी. आहे आणि पांदण रस्त्याचा अंतर दोन कि़मी. अंतराचा आहे. म्हणजेच दोन कि़मी. साठी शालेय विद्यार्थ्यांना जवळपास ८ ते १० कि़लोमीटरची कसरत करावी लागत आहे. यासंदर्भात हत्तीडोई ग्रामपंचायतने या विषयी ठराव मंजुर करून हा पांदण रस्ता आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत तयार करण्यात, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे. (प्रतिनिधी)