भूखंड आहे; पण ग्रामपंचायतजवळ त्याचा पुरावा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:44+5:302021-07-31T04:35:44+5:30
विशाल रणदिवे अडयाळ : गत दोन दशकांत अडयाळ ग्रामपंचायत हद्दीत किती लेआउट आणि त्यामधील ‘ओपन स्पेस’ (भूखंड) कुठे आणि ...
विशाल रणदिवे
अडयाळ : गत दोन दशकांत अडयाळ ग्रामपंचायत हद्दीत किती लेआउट आणि त्यामधील ‘ओपन स्पेस’ (भूखंड) कुठे आणि किती आहेत? याची नेमकी माहितीच अडयाळ ग्रामपंचायत प्रशासनाकडे नाही. डोळ्यासमोर ते भूखंड दिसत असले तरी त्याचा प्रूफ म्हणून ग्रामपंचायतजवळ एकही पुरावा नसल्याची चर्चा मात्र आता गावात चांगलीच रंगली आहे. याचा दोषही तत्कालीन संबंधित अधिकारी तथा ग्रामपंचायत प्रशासनावर केला जात आहे.
हा सर्व प्रकार एका वाचनालय, व्यायामशाळा इमारत बांधकामामुळे उघडकीस आला असल्याची माहिती आहे. ग्रामपंचायत अडयाळने पहिली जागा गुजरी चौकस्थित जिल्हा परिषद तिथे गोंधळ होताच दुसरी जागा अशोकनगरातील ठरविली होती; पण त्या जागेचा ग्रामपंचायतच्या नावावर सात बारा निघाला नसल्याने ग्रामपंचायतीने आता तिसऱ्या ठिकाणी ती इमारत बांधकाम करण्याचे ठरवले आहे; पण यामुळे ग्रामस्थांना व ग्रामपंचायत प्रशासनाला ही चुकून कळले आहे की, जे दिसते तसे नसते.
गत वीस वर्षांत अडयाळ ग्रामपंचायत हद्दीत लहान- मोठे लेआउट पाडून त्या भूखंडाच्या विक्रीसाठी ग्रामपंचायत अडयाळ यांनी परवानगी दिल्याची माहिती आहे. गावात वीस वर्षांत अनेक लेआउट पडले. भूखंडही विकले गेले, ओपन स्पेसही डोळ्यांसमोर दिसत असली तरी त्यावर ग्रामपंचायतीचा अधिकार नाही. कारण सात बारा नाही. लेआउटची निर्मिती करताना नियमानुसार ओपन स्पेस (मोकळी जागा) सोडणे बंधनकारक आहे. या भूखंडाचा उपयोग त्या परिसराचा विकास करण्याकरिता विविध योजनांतून लोकप्रतिनिधींनी निधी मंजूर करून होऊ शकला असता; पण आज त्या ठिकाणी रस्ते, नाल्याव्यतिरिक्त काहीही झाले नाही.