न्युमोकोकल लस रोखणार बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:23 AM2021-07-09T04:23:32+5:302021-07-09T04:23:32+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : बालकांमध्ये न्युमोकोकल न्युमोनिया हा आजार होत असतो, अशा स्थितीत न्युमोनियामुळे बालमृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. ...
इंद्रपाल कटकवार
भंडारा : बालकांमध्ये न्युमोकोकल न्युमोनिया हा आजार होत असतो, अशा स्थितीत न्युमोनियामुळे बालमृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. यावर रामबाण उपाय म्हणून न्युमोकोकल लस प्रभावी ठरणार आहे. यासंदर्भात शासनाने न्युमोकोकल लसीकरण मोहीम राज्यात राबविण्याचे जाहीर केले आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनही तत्पर आहे. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही झाले आहे. लक्षणे आढळताच बालकांना उपचारासाठी न्यावे.
गत तीन वर्षांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास सन २०१७-१८ या वर्षात ३१६ अर्भके मृत्यू झाली. २०१८-१९ मध्ये २६९, तर २०१९-२० मध्ये २३९ अर्भकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. याशिवाय २०१७ मध्ये ४३ बालमृत्यू, २०१८ मध्ये ४२ बालमृत्यू झाले आहेत. गतवर्षी बालमृत्यूअंतर्गत एकूण मृत्यूदर १७.०८ टक्के इतका होता.
काय आहे न्युमोकोकल न्युमोनिया
n न्युमोकोकल न्युमोनिया हा श्वसनासंबंधित बालकांना होणारे एक प्रकारचे इन्फेक्शन आहे. एका जिवाणूमुळे इन्फेक्शन पसरत असते. विशेषतः थुंकीमधून जिवाणू अधिक वेगाने पसरत असतो. थंडीच्या दिवसात या आजाराला अधिकच खत-पाणी मिळते. गर्दीचे ठिकाण आणि रोगप्रतिकार क्षमता कमी असलेल्या बालकांमध्ये याचा प्रादुर्भाव वेगाने होत असतो. त्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यास बालक दगावू शकते.
जिल्ह्यात लसीकरण
n जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासाठी जिल्हा लसीकरण अधिकारी, सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) व तत्सम अधिकारी यांचे प्रशिक्षण दिल्ली येथे झाले आहे. या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तालुकानिहाय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यासंदर्भात शनिवारी व्हीसी होणार असून आरोग्यमंत्री यांच्या दिशा-निर्देशानंतर मोहिमेला प्रारंभ होईल.
या आजाराची लक्षणे काय?
n न्युमोनियाची सामान्य चिन्हे आणि लक्षणे म्हणजे श्लेष्मा किंवा रक्तासह खोकला, शरीराचे तापमान १०१ डिग्री फॅरेनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त होते. तापमान, जास्त घाम येणे आणि थंडी वाजणे, श्वास घेण्यात अडचण, मळमळ आणि उलट्या होणे, छातीत दुखणे, घरघर येणे, पिण्यास अडचण किंवा खाणे किंवा कमतरता, ऊर्जा आणि गोंधळ निर्माण होतो.
n कधीकधी सर्दी किंवा फ्ल्यूमुळे न्युमोनियाच्या चिन्हांचा गैरसमज होतो. म्हणूनच, जर ही लक्षणे तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिली, तर वैद्यकीय मदत घेणे आवश्यक आहे. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात लसीकरणाद्वारे न्युमोनिया टाळता येतो.
जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांना न्युमोनियाचा आजार होऊ नये यासाठी लस देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. राज्य शासनाच्या नियोजनाप्रमाणे लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. सुरुवातीला दोन ते तीन केंद्रात व त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण करण्याचा मानस आहे.
- डॉ. माधुरी माथुरकर,
जिल्हा लसीकरण अधिकारी, भंडारा.