पोक्सोच्या आरोपीला दुसऱ्याच दिवशी जामीन; जनतेत प्रचंड रोष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:00 PM2024-10-07T14:00:48+5:302024-10-07T14:02:14+5:30
Bhandara : वैनगंगा विद्यालय पवनीतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरला : दोन अल्पवयीन विद्यार्थिनींना व्हॉट्सअॅपवर वाईट हेतूने मॅसेज पाठविल्याप्रकरणी वैनगंगा विद्यालय पवनी येथील भोजराज दिघोरे नावाच्या शिक्षकावर पोलिसात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याला न्यायालयीन कोठडीही झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी जमानतीवर सुटका केल्याने पवनीकर जनतेत प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे.
पवनीतील सामाजिक कार्यकर्ते हरीश तलमले, मयूर रेवतकर, मनोहर मेश्राम यांनी रविवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान असला तरी महिला व विद्यार्थी पालकांत प्रचंड रोष व्यक्त होत आहे.
ऑगस्ट महिन्यात एका अज्ञात मुलीच्या पालकाने शिक्षकाविरोधात तक्रार केली होती. याकडे शाळा प्रशासनाने पूर्णतः कानाडोळा केल्याने भोजराज दिघोरे या शिक्षकाची हिंमत वाढली. परिणामी दहाव्या वर्गातील दोन विद्यार्थिनींचा मानसिक छळ झाला.
एसएससी बोर्डात आपले संबंध असल्याचा बनाव करून विद्यार्थिनींना आपलेसे करण्याचा प्रयत्न झाला. असे प्रकार पुन्हा घडू नये म्हणून शाळा प्रशासनाने दक्ष राहावे, अशी मागणी पत्रकार परिषदेतून हरीश तलमले, मयूर रेवतकर, मनोहर मेश्राम यांनी केली आहे.
शिक्षकाचे निलंबन
दरम्यान, वैनगंगा शिक्षण संस्थेने या घटनेची दखल घेत भोजराज दिघोरे या शिक्षकाला निलंबित केले आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळाने सभा बोलावली व अटक झालेल्या शिक्षकांच्या निलंबनाचा ठराव मंजूर करून घेतला. हा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे.
तर पुन्हा मासे लागू शकतात गळाला !
आता भोजराज दिघोरे नावाचा शिक्षक आरोपी म्हणून पुढे आला. परंतु याआधी अज्ञात मुलीच्या पालकाने ऑगस्ट महिन्यात एका शिक्षकाविरोधात मुख्याध्यापकाकडे तक्रार केली होती. मात्र याकडे वैनगंगा शाळा प्रशासनाने पूर्णतः दुर्लक्ष केले होते. सदर प्रकरण सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने उघडकीस आल्याने एका मागून एक प्रकरणे पुढे येत आहेत. पोलिस, शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापनाने कुणालाही पाठीशी न घालता कठोर कारवाई करून लागलेली कीड समूळ नष्ट करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.