जीवनानुभवाच्या शाळेतच लिहिली कविता
By admin | Published: October 6, 2016 12:52 AM2016-10-06T00:52:15+5:302016-10-06T00:52:15+5:30
बालवयातच विवाह, शिक्षण साहित्य आणि संस्कृती यांचा दुरावा अशा विपरीत सामाजिक स्थितीतच माझ्या सासरच्यांनी मला शिकविले.
अंजनाबाई खुणे यांचे प्रतिपादन : कवी आणि कविता विशेष उपक्रम
भंडारा : बालवयातच विवाह, शिक्षण साहित्य आणि संस्कृती यांचा दुरावा अशा विपरीत सामाजिक स्थितीतच माझ्या सासरच्यांनी मला शिकविले. जीवनातील अनुभवांची आणि शाळेतील अक्षरांची मैत्री जुळत गेली यातून माझी कविता प्रकटली. अशा शब्दात झाडीबोलीतील अग्रगण्ण कवचित्री अंजनाबाई खुणे यांनी आपल्या काव्य निर्मितीचे अंतरंग प्रकट केले.
युगसंवाद भंडारा आणि शिवप्रसाद सदानंद जायस्वाल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मोरगाव अर्जुनी यांच्या वतीने कवी आणि कविता या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झाडीबोली चळवळीचे प्रवर्तक डॉ. हरिश्चंद्र बोरकर हे होते. याप्रसंगी निमंत्रित कवयित्री अंजनाबाई खुणे, श्रीराम खुणे यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह देवून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बोलीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा प्राचार्य गुरूप्रसाद पाखमोडे, डॉ. अनिल नितनवरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कवयित्री अंजनाबाई खुणे यांची मुलाखत प्रा. श्रीकांत नाकाडे यांनी घेतली. अंजनाताईच्या जीवनातील विविध पैलू श्रोत्यांसमोर उलगडले. अंजनाबाई खुणे यांनी त्यांच्या उत्कृष्ट कवितांचे वाचन केले. त्यांच्या काव्यावर आस्वादक प्रतिक्रिया प्रा. संजय निंबेकर, हिरामण लांजे यांनी व्यक्त केल्या. अध्यक्षीय भाषणातून डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी बोलीभाषेचे महत्व अधोरेखांकित करून अंजनाबाईची कविता ही नैसर्गीक सौंदर्याने बहरलेली असल्याने या कवितांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्राणांची आहुती देणारे सैनिक तसेच कवी भगवान भोईदर, शंकर बढे, निलेश पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन प्रा. शरद मेश्राम यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य गुरूप्रसाद पाखमोडे यांनी केले. आभार प्रा. नरेश आंबिलकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)