पोहरा सर्वात मोठी तर खैरी सर्वात लहान ग्रामपंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:46+5:302020-12-31T04:33:46+5:30
भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात १४८ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुक होणार आहे. यामध्ये ...
भंडारा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात १४८ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुक होणार आहे.
यामध्ये सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या लाखनी तालुक्यातील पोहरा येथे उमेदवार शोधताना पॅनल प्रमुखांची चांगलीच दमछाक झाली. दुसरीकडे सर्वात लहान असलेल्या लाखनी तालुक्यातील खैरी ग्रामपंचायतीमध्ये गावपुढारी सक्रीय झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये यंदा पक्षांचा बोलबाला राहील असे संकेत होते. मात्र तसे झाले नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या पोहरा ग्रामपंचायतीमध्ये पक्षांना विशेष महत्व नसुन गटबाजी करुन निवडणुक लढविल्या जाते. प्रत्येक गटात विविध पक्षांचे कार्यकर्ते व पुढाऱ्यांचा समावेश असतो. सध्या गावात राजकीय बैठकांना उत आला असुन रात्रीच्या सुमारास भेटीगाठी सुरु आहेत.
दुसरीकडे खैरी ग्रामपंचायतमध्ये निवडणुक येण्यासाठी गावात रस्सीखेच सुरु झाली आहे. गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असुन पॅनल प्रमुखांची दमछाक होत असताना दिसुन येत आहे. जिल्ह्यात सर्वात लहान व सर्वात मोठी ग्रामपंचायत ही लाखनी तालुक्यातच आहे. २३ डिसेंबर पासुन नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला प्रारंभ झाला. त्यानंतर २५, २६ व २७ तारखेला शासकीय सुटी होती. त्यामुळे सोमवार, मंगळवार व बुधवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कॅफे व तहसील कार्यालयात गर्दी उसळली होती. नेट प्राॅब्लेम लक्षात घेता राज्य शासनाने बुधवार रोजी ३ वाजताची असलेली वेळ वाढवुन साडे पाच पर्यंत केली. उमेदवारांना दिलासा मिळावा म्हणुन बँक पासबुक तयार करण्यासाठी तसेच जात पडताळणी मध्ये अडचण होऊ नये यासाठी काही प्रमाणात शिथीलता दिल्याने आज जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. ऑनलाईनच्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात आल्याने आज अर्जनविसांना दिलासा मिळाला.