विषारी औषध प्राषण केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: October 2, 2023 06:37 PM2023-10-02T18:37:41+5:302023-10-02T18:37:54+5:30
विरली (बु) येथील घटना : लाखांदूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तांदळामध्ये टाकण्याचे विषारी औषध प्राशन केल्याने २८ वर्षीय विवाहित महिलेचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला घटना लाखांदूर तालुक्यातील विरली (बु) येथील असून मेघा रवी मेश्राम (२८) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. तीन दिवसांनंतर तिची मृत्यूशी झुंज संपली.
पोलीस सूत्रानुसार, मेघाने ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास स्वतःच्या घरीच सेल्फ फॉंक्स नावाचे तांदळामध्ये टाकण्याचे विषारी औषध प्राशन केले. ही घटना मेघाच्या कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ तिला उपचारासाठी लाखांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असतांनाच १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मेघाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मेघाने विष प्राशन कोणत्या कारणाने केले हे मात्र अद्याप कळू शकले नाही. या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली असून या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार सतीश सिंगनजुडे, पोलिस अंमलदार विकास रणदिवे करीत आहे.