वास्तू पूजनाच्या भोजनातून १०४ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:27 AM2021-06-04T04:27:17+5:302021-06-04T04:27:17+5:30

गजानन खोकले व सुनील खोकले यांनी कोथुर्णा येथे नवीन घर बांधले. बुधवारी त्यांच्याकडे गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूजन ...

Poisoning of 104 people from Vastu Puja meal | वास्तू पूजनाच्या भोजनातून १०४ जणांना विषबाधा

वास्तू पूजनाच्या भोजनातून १०४ जणांना विषबाधा

googlenewsNext

गजानन खोकले व सुनील खोकले यांनी कोथुर्णा येथे नवीन घर बांधले. बुधवारी त्यांच्याकडे गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूजन आणि भोजनाचा कार्यक्रम होता. गावासह परिसरातील गावांतील आप्तस्वकीयांना भोजनाचे निमंत्रण देण्यात आले होते. जवळपासच्या गावातील २०० पेक्षा अधिक नागरिक या कार्यक्रमात सहभागी झाले. जेवण केल्यानंतर बुधवारी रात्री सर्वजण घरी गेले. मात्र, गुरुवारी सकाळी अचानक मळमळ, उलट्या, जुलाब आणि अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे गावकऱ्यांनी आरोग्य उपकेंद्रात धाव घेतली. सुरुवातीला कमी असलेली संख्या हळूहळू वाढू लागली. स्थानिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी ही माहिती वरिष्ठांना दिली. दरम्यान, अन्नातून विषबाधा झाल्याचे पुढे आले. दुपारी २ वाजेपर्यंत तब्बल १०४ नागरिकांना विषबाधा झाल्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे वास्तू पूजनाचे आयोजक घरमालक गजानन खोकले यांनाही विषबाधा झाली. सर्वांवर कोथुर्णा येथील उपकेंद्रात उपचार करण्यात आले. कुणालाही गंभीर स्वरूपाची लक्षणे नसल्याने उपचार करून सुट्टी देण्यात आली. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

या घटनेची माहिती होताच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, तहसीलदार अक्षय पोयाम, उपविभागीय अधिकारी संजय पाटील यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली.

बाॅक्स

घरमालकांवर गुन्हा दाखल

राज्यात कोरोनाची स्थिती अद्यापही बिकट आहे. लाॅकडाऊन १५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेनमध्ये शिथिलता दिली. मात्र, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे. असे असतानाही गजानन खोकले यांनी वास्तू पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. नियमापेक्षा अधिक आप्तस्वकीयांना विनापरवानगी भोजनासाठी बोलाविले. यामुळे त्यांच्याविरुद्ध तलाठी सिमेश हुमणे यांनी तक्रार दिली. त्यावरून वरठी पोलीस ठाण्यात गजानन खोकले व सुनील खोकले यांच्यावर भादंवि २७०, १८८, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी करीत आहेत.

बाॅक्स

पाण्यातून विषबाधेचा संशय

वास्तू पूजनाच्या भोजनासाठी घराशेजारच्या विहिरीचे पाणी वापरण्यात आले, तर पिण्यासाठी नळाचे पाणी वापरण्यात आले होते. या पाण्यातूनच विषबाधा झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, लहानशा कोथुर्णा गावात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली.

Web Title: Poisoning of 104 people from Vastu Puja meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.