पाणीपुरीतून 78 जणांना विषबाधा, बालिकेचा मृत्यू; सर्वांची प्रकृती धाेक्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 04:46 AM2021-03-17T04:46:38+5:302021-03-17T06:57:16+5:30
१९ जणांवर पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे (११, रा. भेंडाळा), असे मृत बालिकेचे नाव आहे. रविवारी भेंडाळा येथे आठवडी बाजार भरला हाेता. या बाजारात गावातील अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. (Bhandara)
भंडारा : आठवडी बाजारातील पाणीपुरी खाल्ल्याने तब्बल ७८ जणांना विषबाधा हाेऊन एका बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पवनी तालुक्यातील भेंडाळा येथे मंगळवारी घडली. आराेग्य विभागाने गावात धाव घेऊन शिबिर लावले असून, सध्या सर्वांची प्रकृती धाेक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये ४१ पुरुष, २२ महिला, सहा मुले आणि नऊ मुलींचा समावेश आहे. (Poisoning of 78 people from Panipuri, death of a girl)
१९ जणांवर पवनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वरी रामदास सतीबावणे (११, रा. भेंडाळा), असे मृत बालिकेचे नाव आहे. रविवारी भेंडाळा येथे आठवडी बाजार भरला हाेता. या बाजारात गावातील अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. रात्री काही जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास हाेऊ लागला. त्यामुळे त्यांनी खासगी डाॅक्टरांकडून उपचार घेतले. दुसऱ्या दिवशी साेमवारीही काही जणांनी हाच त्रास हाेत असल्याने आसगाव, पवनी येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तोपर्यंत याबाबत कुणालाही माहिती नव्हती. मात्र, मंगळवारी सकाळी ९ वाजता ज्ञानेश्वरी या बालिकेचा भाेवळ येऊन अचानक मृत्यू झाला आणि एकच खळबळ उडाली.
दरम्यान, मंगळवारी अनेकांना मळमळ आणि उलटीचा त्रास हाेऊ लागला. आराेग्य यंत्रणेला याची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुखी, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके यांनी भेंडाळा गावाला भेट दिली. पाणीपुरीचे नमुने घेण्यात येणार आहेत.
ज्ञानेश्वरीच्या मृत्यूनंतर खडबडून जाग
दाेन दिवसांपासून गावात मळमळ आणि उलटीचा त्रास हाेत असला तरी कुणी फारसे याकडे लक्ष दिले नाही. ज्ञानेश्वरीच्या मृत्यूनंतर खळबळ उडाली. आराेग्य यंत्रणेला माहिती देण्यात आली. ज्ञानेश्वरी पाचव्या वर्गात शिकत हाेती. साेमवारी तिने शाळेत जाऊन शिष्यवृत्तीचा अर्ज भरला हाेता.