बामणी रेती घाटावर पोकलॅन्ड, जेसीबीने रेती खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2017 12:17 AM2017-02-01T00:17:59+5:302017-02-01T00:17:59+5:30
तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाह्मणी रेती घाटावरून पोकलॅन्ड, जेसीबीसह अन्य यंत्राने रेतीचे नियमबाह्य सर्रास खनन सुरू आहे.
महसूल प्रशासनाचे मौन : राजकीय संबंधामुळे कारवाई करण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
मोहन भोयर तुमसर
तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीवरील बाह्मणी रेती घाटावरून पोकलॅन्ड, जेसीबीसह अन्य यंत्राने रेतीचे नियमबाह्य सर्रास खनन सुरू आहे. नदीपात्रात सीमांकनाचा पत्ता नाही. रेती खननामुळे जमिनीचा तळ गाठला आहे. येथे महसूल प्रशासनाने मौन धारण केल्याचे दिसून येत आहे. राजकीय पदाधिकारी या रेती घाटाच्या व्यवसायात गुंतलेले असल्यामुळे या रेती घाटाकडे कुणी फिरकत नसल्याचे वास्तव आहे.
महसूल प्रशासनाने सन २०१६-२०१७ वर्षाकरिता वैनगंगा नदीवरील बाह्मणी रेती घाटांचा लिलाव केला. विस्तीर्ण नदी पात्र, पांढरी शुभ्र रेती, रेती घाटावर जाण्याकरिता पक्का रस्ता असे या रेती घाटाचे वैशिष्ट्य आहे. नदीतील ३७४ गटक्रमांकांचे ४.५ हेक्टर क्षेत्र २ कोटी ३३ लाख रूपये, ३७१ गट क्रमांकांचे ४.५० हेक्टर क्षेत्र १ कोटी ३१ लाख रूपयात लिलाव झाला आहे. बाह्मणी नदी पात्रात दोन यंत्रांच्या साहाय्याने रेतीचे खनन सुरु आहे. यात एक जेसीबी व एक पोकलँडचा समावेश आहे.
नियमानुसार एक मीटरपेक्षा जास्त रेतीचा साठा गरजेचे आहे. परंतु या नदी पात्रात सुमार रेती खननामुळे काळी माती दिसत आहे. रेती घाटावर नियमानुसार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज आहे. परंतु तेही येथे दिसत नाही. दरवर्षी हा रेती घाट लिलाव होतो. तुमसरपासून अवघ्या चार कि.मी. अंतरावर हा रेतीघाट आहे. नदीपात्रात महसूल प्रशासनाने सीमांकन नक्कीच करून दिले असणार. परंतु सध्या सीमांकन कुठून कुठपर्यंत आहे तेही दिसत नाही.
तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक व अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर नदी घाटावर पाहणी करून कागदोपत्री अहवाल सादर करणे असा काम येथे सुरु आहे. बाह्मणी रेती घाटापासून तीन कि.मी. अंतरावर वैनगंगा नदीवरील चारगाव रेती घाट लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु येथे रेती खनन सुरु करण्यात आले नाही. येत्या दोन ते तीन दिवसात तेथेही रेती उपसा सुरु होणार आहे. चारगाव येथे गट क्रमांक ७० मधील ४.५० हेक्टर १ कोटी २७ लाख ७८६ रूपयात या घाटाचा लिलाव झाला आहे. कोट्यवधींना जाणारा हा रेती घाट लिलावानंतर केवळ कागदोपत्रीच येथे कारवाई सुरु राहते. महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाई करावी असा नियम आहे.
मोहाडी तालुक्यातील निलज घाटावर रात्री पोलिसांनी धडक कारवाई केली होती. येथे रात्री रेतीचे उत्खणन सुरु होते. बाह्मणी व चारगाव रेतीघाटाशी राजकीय पदाधिकाऱ्यांचे संबंध आहे. त्यामुळे महसूल व पोलीस प्रशासन या घाटाकडे कुणी ढुंकूनही पाहत नसल्याची वास्तविकता आहे.
तालुक्यातील बाह्मणी रेती घाटाचे लिलाव झाले त्याचवेळी सीमांकन करून देण्यात आले आहे. या घाटावर वेळोवेळी जाऊन पाहणी केली जाते. परंतु असा प्रकार दिसून आला नाही. यंत्राने रेती खनन सुरु असल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
-डी.टी. सोनवाने,
तहसीलदार तुमसर