जिल्हाभर पोळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 12:54 AM2019-08-31T00:54:50+5:302019-08-31T00:55:25+5:30
भंडारा शहरातही पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मोठा बाजार परिसर, गणेशपूर, शुक्रवारी परिसर, जलाराम चौक, मेंढा येथे याठिकाणी पोळा भरविण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून आणल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कृषीप्रधान संस्कृतीतील महत्वाचा उत्सव बैलपोळा. शुक्रवारी जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. एक नमन गौरा हर हर महादेवचा गजर गावागावात गुंजला. पोळ्यात रंगलेल्या झडत्यांनी चांगलीच रंगत आली.
भंडारा शहरातही पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील मोठा बाजार परिसर, गणेशपूर, शुक्रवारी परिसर, जलाराम चौक, मेंढा येथे याठिकाणी पोळा भरविण्यात आला. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या सजवून आणल्या होत्या. याठिकाणी बैलांची पूजा करण्यात आली. गणेशपूर येथील पोळ्यात उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षीस देण्यात आले. त्यात सुहास भुरे, हिरामण मेहर, संजय साठवणे, भैय्यालाल थोटे, रामभाऊ खोब्रागडे, राजकुमार कांबळे, प्रवीण मते यांच्या बैलजोडींना गौरविण्यात आले.
पोळ्याचा खरा उत्साह दिसून आला तो ग्रामीण भागात. पालांदूर पोळा भरविला असता वरूण राजाने जोरदार हजेरी लावली. या पावसातही शेतकºयांचा उत्साह कुठे कमी झाल्याचे दिसत नव्हते. आंधळगाव येथे बैल पोळ्याला आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. दांडपट्टा खेळत पोळा उत्सव साजरा करण्यात आला. पवनी तालुक्यातील कोंढा येथेही पोळा साजरा झाला. चिचाळ येथे पोळ्यात प्रथम क्रमांक शिवसागर अहिरे यांच्या बैल जोडीने पटकाविला.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे आजच तान्हा पोळाही साजरा करण्यात आला. त्यावेळी चिमुकल्यांनी नंदीबैलासोबत स्वच्छतेचे महत्व सांगणारे फलक लावले होते. पवनी तालुक्यातील धानोरी येथे घरोघरी बैलांची पूजा करून पोळा सण साजरा करण्यात आला.
झडत्यांनी आणली रंगत
सजविलेले बैल पोळ्याखाली आल्यानंतर शेतकºयांतील प्रतीभेला चांगलाच बहर आला. एकाहून एक सरस झडत्यांची बरसात झाली. एक नमन गौरा हर हर महादेवचा गजर करीत झडत्या देण्यात आल्या.