लग्न वऱ्हाडी बनून पोलिसांनी घातली रेतीघाटावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:34 PM2020-03-06T23:34:58+5:302020-03-06T23:35:30+5:30
धाड टाकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नामी शक्कल लढविली. खासगी वाहन भाड्याने घेतली. त्यांच्यार मॅरेज पार्टी असे फलक लावले. एवढेच नाही तर नवरदेवासाठी एक गाडीही सजविण्यात आली. या तीन वाहनात १५ अधिकारी पवनी तालुक्यातील कातखेडा घाटावर मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. लग्नाची वऱ्हात समजून रेतीमाफिये बेसावध होते. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकून दब्बल १२ टिप्पर आठ जेसीबी जप्त केले.
अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : जिल्ह्यात रेतीमाफियांनी धुमाकूळ घातला असून कारवाईसाठी गेलेले पथक दुरून दिसताच माफिये वाहनासह पसार होतात. त्यामुळेच पोलिसांनी आगळी वेगळी शक्कल लढवून रेतीघाटांवर धाड मारली. पोलीस चक्क लग्न वºहाडी होवून तालुक्यातील खातखेडा रेतीघाटावर पोहचले आणि दहा जणांना ताब्यात घेत १२ टिप्पर व आठ जेसीबी जप्त केल्या. या कारवाईने रेती तस्करांच्या पायाखालची वाळू मात्र सरकली.
गत कित्येक महिन्यांपासून जिल्ह्यातील रेतीघाट बंद आहे. मात्र मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होत आहे. हा प्रकार खुलेआम सुरू होता. परंतु कारवाईपुर्वीच रेती तस्कर पसार होत होते. त्यामुळे गुरूवारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात बैठक घेण्यात आली. धाड टाकण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी नामी शक्कल लढविली. खासगी वाहन भाड्याने घेतली. त्यांच्यार मॅरेज पार्टी असे फलक लावले. एवढेच नाही तर नवरदेवासाठी एक गाडीही सजविण्यात आली. या तीन वाहनात १५ अधिकारी पवनी तालुक्यातील कातखेडा घाटावर मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. लग्नाची वऱ्हात समजून रेतीमाफिये बेसावध होते. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकून दब्बल १२ टिप्पर आठ जेसीबी जप्त केले. टिप्पर चालक-मालक दहा जणांना अटक करण्यात आली. अटकेतील माफियांकडून माहिती मिळून काही जणांना अटक केली जाणार आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. याप्रकरणी पवनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे अधिक तपास करीत आहे.
धाबे दणाणले
पोलिसांनी नामी शक्कल लढवून रेती घाटावर धाड टाकल्याची माहिती शुक्रवारी संपूर्ण जिल्ह्यात पसरली. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रेतीघाटावर तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनेक रेतीतस्करांनी आपले खबरे पोसले आहेत. परंतु या खबऱ्यांनाही अशा नामी शक्लीमुळे अंदाज आला नाही आणि जिल्हा पोलिसांची रेती तस्कराविरूद्ध धाड यशस्वी झाली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत परसराम महादू महादे रा. सोनेगाव, लिखिराम बस्तीराम शेंडे रा. बिडगाव, दीपक मधुकर शेंडे रा. कळमना नागपूर, शरद देविदास कुरूडक रा. डोंगरगाव, मेनसिंग मंगलसिंग खंडाते रा. नागपूर, स्वप्निल नत्थूजी मांढरे रा. पाचगाव, शिशिर निलकंठ झाडे रा. टाकळी नागपूर, लियाकत अली मुबारक अली रा. नागपूर, नौशाद रहमतुल्ल खान रा. खरबी नागपूर यांना अटक करण्यात आली असून दहा चालक पसार झाले आहे.