चिचोली येथील पोलीस पाटलावर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:34 AM2021-04-11T04:34:37+5:302021-04-11T04:34:37+5:30
गतवर्षी चिचोली येथील पोलीस पाटलांचे कुटुंबीय व अन्य एका कुटुंबीयांत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. सदर भांडणावरून दोन्ही कुटुंबांनी ...
गतवर्षी चिचोली येथील पोलीस पाटलांचे कुटुंबीय व अन्य एका कुटुंबीयांत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. सदर भांडणावरून दोन्ही कुटुंबांनी परस्परविरोधी पोलिसांत तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. त्या तक्रारीवरुन लाखांदूर पोलिसांनी दोन्ही कुटुंबाविरोधात प्रतिबंधक कारवाईदेखील केली होती. मात्र, तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशी केली असता पोलीस पाटील व अन्य कुटुंबात नेहमीच कुरघोडीचे वातावरण दिसून येताना भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली होती.
तथापि, गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलीस पाटलांची असताना खुद्द पोलीस पाटीलच कर्तव्यात अनियमितता व बेजबाबदारपणाचे वर्तन करीत असल्याचा माहितीअहवाल लाखांदूर पोलीस विभागांतर्गत उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. त्यानुसार साकोलीचे उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे यांनी सदर माहिती अहवालाचे अवलोकन करून याप्रकरणी पारित एका आदेशान्वये चिचोली येथील पोलीस पाटलांवर ठपका ठेवला आहे.
दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांकडून गावात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यात एका पोलीस पाटलांकडून कर्तव्यात अनियमितता व बेजबाबदारपणा होत असल्याच्या कारणावरून ठपका ठेवल्याने तालुक्यातील अन्य पोलीस पाटलांकडून खबरदारी घेतली जात असल्याची चर्चा आहे.