पोलीस-नागरिकांचे नाते विश्वासाचे असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:17 AM2018-03-16T01:17:57+5:302018-03-16T01:17:57+5:30
नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणे हे पोलिसांचे कार्य नाही तर पोलिसांप्रती ग्रामस्थांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे आणि शासनाला सुद्धा हेच अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणे हे पोलिसांचे कार्य नाही तर पोलिसांप्रती ग्रामस्थांच्या मनात आपलेपणाची भावना निर्माण करणे हेच पोलिसांचे कर्तव्य आहे आणि शासनाला सुद्धा हेच अपेक्षित आहे. पोलीस आणि नागरिकांचे नाते हे विश्वासाचे असावे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.
कारधा पोलीस ठाण्या अंर्तगत चांदोरी या गावी आयोजित फिरत्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड, पोलिस निरिक्षक रवींद्र मानकर, पोलीस उपनिरीक्षक लांडे व सरपंच रंभांबाई नागदेवे उपस्थित होते.
विनिता साहू म्हणाल्या, पोलीस विभागाने केवळ गुन्हे नोंदणीच नाही तर शासनाच्या लोकाभिमुख योजना सुद्धा नागरिकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे, याच भावनेतून भंडारा जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून 'फिरते पोलीस स्टेशन' हा उपक्रम राबविला जात आहे. आजही नागरिक पोलीस ठाण्यात यायला घाबरतात. समस्या ुग्र रूप धारण करतात. पोलिसांविषयी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. ही भीती दूर व्हावी व नागरिकांच्या समस्यांचा योग्य वेळी निपटारा व्हावा म्हणूनच आम्ही आपल्या दारी आलो आहो. मोकळ्या मनाने आपल्या समस्या व तक्रारी मांडा, असे आवाहन विनिता साहू यांनी केले. जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे घरून निघुन जाण्याचे प्रमाण अधिक आहे असे सांगून साहू म्हणाल्या की, आई वडील व मुलांमध्ये विश्वासाचे नाते असायला हवे. मुलांशी संवाद वाढवा, त्यांचे म्हणणे एकूण घ्या, त्यांच्यावर भरोसा दाखवा.
पोलीस विभागाची १०९१ ही खास महिलांसाठी हेल्पलाईन आहे. या सोबतच अँप, फेसबुक पेज व व्हाट्सअॅप नंबर वर आपण आपली तक्रार नोंदवा, असे आवाहन विनिता साहू यांनी केले. कौटुंबिक वाद, किरकोळ वाद, मारहाण, शेतीचे भांडण, आपसातील वाद यासह ज्या समस्या पोलीस स्टेशन समोर येऊ शकत नाही अशा समस्यांचा निपटारा करण्यासाठीच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून फिरते पोलीस स्टेशन हा उपक्रम राबविला जात असल्याचे संजय जोगदंड यांनी सांगितले.
फिरते पोलीस स्टेशन हा उपक्रम शासनाने राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा शासन निर्णय सुद्धा निर्गमित केला आहे. फिरते पोलीस स्टेशनचा भंडारा पॅटर्न तेलंगणा, चंदीगड व पश्चिम बंगाल या राज्यात राबविला जात आहे. मागील वर्षापासून जिल्हाभरात ८९१ कार्यक्रम घेण्यात आले व २२० तक्रारीचा निपटारा करण्यात आला. या उपक्रमासाठी ७ प्रोजेक्टर प्राप्त झाले असून ते सात पोलीस ठाण्यात देण्यात आले आहेत. शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली.