आंतरराज्यीय मार्गावरील पोलीस नियंत्रण कक्ष बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 09:56 PM2018-11-21T21:56:22+5:302018-11-21T21:56:40+5:30
आंतरराज्यीय मार्गावर खापा शिवारात पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केल्यानंतर पुन्हा बुधवारी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आदेशाने पोलीस नियंत्रण कक्ष आकस्मिक बंद करण्यात आली. यामुळे मध्यप्रदेशाकडे जाणारा मार्ग पुन्हा तस्करांना मोकळा झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंतरराज्यीय मार्गावर खापा शिवारात पोलीस नियंत्रण कक्षाची स्थापना केल्यानंतर पुन्हा बुधवारी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आदेशाने पोलीस नियंत्रण कक्ष आकस्मिक बंद करण्यात आली. यामुळे मध्यप्रदेशाकडे जाणारा मार्ग पुन्हा तस्करांना मोकळा झाला आहे. सध्या मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातले आहे. रोख व मद्याची खेप या मार्गाने जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
तुमसर-भंडारा-गोंदिया-रामटेक हा प्रमुख राज्यमार्ग असून बालाघाट व वाराशिवनी येथे हा आंतरराज्यीय मार्ग खापा शिवारातून जातो. सध्या मनसर-गोंदिया-बालाघाट हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वाहतूक सुरू राहते. खापा शिवारात पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रणाकरिता कापडी तंबूत पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन केले होते. यामुळे असा मागील तत्व व वाहतूक व्यवस्थेत मोठा परिणाम झाला होता.
खापा चौक ते तुमसर शहराचे मुख्य प्रवेशद्वार आहे. तुमसर तालुक्यात जगप्रसिद्ध मॅग्नीज खाणी तथा मॅग्नीजचे मोठे साठे आहेत. मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू आहे. बालाघाट, कटंगी, शिवनी, जबलपूर मार्गे मॅग्नीज मिश्रीत धातंूचे ट्रक याच मार्गाने धावतात. वनसंपदा तालुक्यात मोठी आहे. गोंदिया-रामटेक-मनसर मार्गही चोवीस तास सुरू असतो. दोन राज्यांना जोडणाºया रस्त्यावर मुख्य चौकात अस्थायी पोलीस नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय पोलीस विभागाने घेतला. त्याचे चांगले परिणाम पुढे आले. परंतु बुधवारी सकाळी पोलिसांनी लाकडी तंबू तत्काळ हटविण्यात आला. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मध्यप्रदेशात विधानसभेच्या निवडणुका केवळ आठ दिवसावर येवून ठेवल्या आहेत. यापूर्वी नागपूर पांढरकवडा, छिंदवाडा मार्गावर रोख रक्कम नेतानी पोसिलांनी पकडले. तुमसरमार्गे बालाघाट, वारासिवनी, कटंगी येथे सहज जाता येते. तपासणी व चौकशी केंद्र सीमेवर दिसत नाही. केवळ सोपस्कार म्हणून ती आहेत. वनविभागाची चौकशी व तपासणीही थातुरमातुर केली जाते. बालाघाट जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. रोख व मद्याची खेप नेण्यातील मुख्य अडसर खापा चौकातील पोलीस नियंत्रण कक्ष होते. बुधवारी ती हटविल्याने सदर मार्ग मोकळा झाला. पोलीस मुख्यालयाने दिलेल्या आदेशाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. पोलीस चौकी कां हटविली हा संशोधनाचा विषय आहे. येथे ट्रक चालकांची लॉबी सक्रीय असल्याचे बोलले जात आहे.
खापा चौकातील पोलीस चौकी बुधवारी सकाळी बंद करण्यात आली. जिल्हा मुख्यालयातून तसे आदेश प्राप्त झाले. मागील दीड महिन्यापुर्वी पोलीस चौकी आदेशान्वये स्थापन करण्यात आली होती.
-मनोज सिडाम,
पोलीस निरीक्षक तुमसर.