अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास पोलीस अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 10:44 PM2018-04-13T22:44:08+5:302018-04-13T22:44:08+5:30
अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पंधरा दिवसात करावा व गैरअर्जदारांना अटक करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनुसूचित जाती- जमाती अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समितीने पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात पोलीस प्रशासनाला अद्यापही यश आले नाही. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पंधरा दिवसात करावा व गैरअर्जदारांना अटक करण्यात यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अनुसूचित जाती- जमाती अन्याय-अत्याचार विरोधी संघर्ष समितीने पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मौजा दिघोरी पोलीस ठाणे अंतर्गत चिचाळ (बारव्हा) येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जातो म्हणून घरुन सकाळी १० वाजता निघून गेली त्यानंतर ती घरी परत आली नाही. सर्व नातेवाईकांकडे तिची शोधाशोध घेतली. परंतु कुठेच न मिळाल्यामुळे २२ नोव्हेंबर २०१७ रोजी दिघोरी पोलीसात कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलीला व्हॅनने नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांना माहिती देऊन पोलिसांनी त्या वाहनाचा शोध घेतला. वाहन मालकाची चौकशी घेऊन त्याला सोडण्यात आले. वाहन चालकाने दिलेल्या माहितीनुसार मुलीला आणण्यासाठी व गैरअर्जदारांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक व मुलीचे वडील स्वत: गेले होते. परंतु मुलगी, गैरअर्जदार पसार झाल्याचे दिसून आले. गैरअर्जदार हे गुंडप्रवृत्तीचे असून तीन जिल्ह्यामध्ये त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
तिन्हीही जिल्ह्याची पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र गेल्या चार महिन्यापासून पोलिसांना गैरअर्जदार मिळाले नाही व मुलगीसुध्दा मिळाली नाही हे दुर्देव आहे.
अल्पवयीन मुलगी अनुसूचित जातीची असून जिवंत आहे किंवा तिची विक्री करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पंधरा दिवसात करावा व गैरअर्जदारांना अटक करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी दिघोरीचे ठाणेदार फसाटे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी टिक्कस उपस्थित होते. शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे कन्हैया नागपुरे, लिलाधर बन्सोड, सुरज कुथे, ज्ञानेश्वर निकुरे, चंद्रशेखर भिवगडे, डी.जी. रंगारी उपस्थित होते.