पोलीस शिपायाकडून युवतीची फसवणूक
By admin | Published: June 29, 2016 12:33 AM2016-06-29T00:33:02+5:302016-06-29T00:33:02+5:30
पोलीस शिपाई असलेल्या युवकाने लग्नच्या आणाभाका देऊन युवतीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान विवाहाबाबत तो नेहमी ....
विवाहानंतर नांदवायला तयार नाही : पीडित युवतीची मदतीची मागणी
मोहाडी : पोलीस शिपाई असलेल्या युवकाने लग्नच्या आणाभाका देऊन युवतीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. दरम्यान विवाहाबाबत तो नेहमी उडवाउडवीचे उत्तर देवू लागल्याने युवतीने थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यामुळे युवकाने मंदिरात लग्न उरकविले. पण तिला पत्नी म्हणून नांदवायच्या ऐवजी सोडून पळ काढल्याने मला पत्नीचा हक्क मिळवून द्यावा, अशी मदत आता युवती मागत आहे.
तालुक्यातील सकरला येथील गुरूदेव धनराज शेंडे हा युवक भंडारा पोलीस दलात कार्यरत आहे. त्याचे एका युवतीवर प्रेम जडले. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार त्याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले. युवतीने वारंवार विवाह करण्याची गळ त्याला घातली. मात्र, तो नेहमी उडवाउडवीचे उत्तरे देवू लागल्याने तीने आंधळगंव पोलिसात त्याच्याविरूध्द तक्रार दाखल केली. नौकरी जाईल या भीतीने त्याने युवतीशी मंदीरात लग्न केले. त्यानंतर त्याने तिला पत्नी म्हणून स्विकार करण्याऐवजी तिच्या पासून दूर राहू लागला. त्यामुळे पीडित विवाहिता पुन्हा पोलिसात पोहचली.
तत्पूर्वी गुरूदेवने तिला लग्न करण्याचे आमिष देवून भंडारा, खिंडसी, रामटेक येथील लॉजवर तथा अन्य ठिकाणी नेवून वारंवार तिच्यावर अत्याचार केला. मात्र लग्नासाठी टाळाटाळ करू लागल्याने त्या युवतीने आंधळगाव पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनीही दोघांना समजावून तक्रार दाखल केली नाही. दोघांचा विवाह एका मंदिरात पार पडला. लग्न करून आई-वडिलांचा विरोध असल्याने आंधळगाव येथे एक दिवस सोबत घालविला. त्यानंतर पोलीस प्रशिक्षणासाठी जायचे असल्याचा बहाना करून पत्नीला तिच्या मावशीच्या घरी ठेवले. चार महिन्यात फक्त एकदाच भेटायला आला. खोलीचे भाडे व जेवणाचा खर्च सुद्धा दिला नाही. वैतागुन त्या युवतीने सरळ पोलीस मुख्यालय गाठून त्या युवकाला जाब विचारले असता युवकाने तिच्याशी कोणताही संबंध ठेवण्यास नकार दिल्याने ती निराश झाली.
त्यानंतर ती आई व बहिणीला घेवून गुरूदेवच्या घरी गेली व पत्नी म्हणून स्विकार करण्याची विनंती केली. मात्र पती गुरूदेव, सासरे, धनराज शेंडे, सुनिता शेंडे, विजू रतिराम डोये, छाया शेंडे, रिना शेंडे, दयाराम डोये यांनी एकत्र येवून तिघांनीही मारहाण करून घरातून हाकलून लावले. याची तक्रारसुद्धा आंधळगाव पोलिसात करण्यात आली. मात्र पोलिसांनी पती पत्नीचे प्रकरण समजून हे प्रकरण महिला समुपदेशन केंद्राकडे वर्ग केले. सध्या ती युवती माहेरी वैफल्यग्रस्त जीवन जगत आहे. गुरूदेवमुळे एका तरूणीचे जीवन उध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. अन्यायग्रस्त युवतीने सदर माहिती पत्ररिषदेत कथन करून पत्नीचा हक्क् मिळवून द्यावा, अशी विनवनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)