साठे महामंडळाचा एमडी बावनेला पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:07 AM2017-12-29T05:07:03+5:302017-12-29T05:07:05+5:30
भंडारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधीच्या घोटाळ्यात सामील महामंडळाचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावने याला गुरुवारी दुपारी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
भंडारा : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधीच्या घोटाळ्यात सामील महामंडळाचा तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक श्रावण किसन बावने याला गुरुवारी दुपारी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी बावनेला सोमवारपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
महामंडळात केलेल्या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. त्याच्याशी संगनमत करून या गैरव्यवहारात सहभागी असल्याचा आरोप श्रावण बावने याच्यावर आहे. ‘लोकमत’ने हे घोटाळे उघडकीस आणले होते. बावनेला पुणे सीआयडीच्या पथकाने राजकोटमध्ये शिताफीने अटक केली.
बावनेपूर्वी भंडारा येथील साठे महामंडळातील कर्मचारी प्रताप पवार याला वर्षभरापूर्वी अटक करण्यात आली आहे. भंडारा येथे २४ कोटी ६२ लाख १० हजार रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. बावने हा व्यवस्थापकीय संचालक असल्यामुळे महामंडळाचा निधी भंडारा येथे वर्ग करून त्यानंतर रोखीने रक्कम काढत होता. गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक रमेश मेश्राम यांनी ९ जून २०१५ला पोलिसांत तक्रार केली होती.
बावनेला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, अॅड. प्रमोद भुजाडे यांनी युक्तिवाद केला. न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी बावनेला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. आरोपी श्रावण बावने याला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या भरारी पथकाचे पोलीस उपअधीक्षक तपास अधिकारी एस. जे. नेवले यांच्या पथकाने भंडाºयात आणले होते.