पोलिसांच्या तपासणीने बचावले अनेकांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:41+5:30
बुधवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास तपासणीसाठी नागपूर-भंडारा शिवशाही बस थांबविण्यात आली. पोलीस प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करीत होते. त्याचवेळी चालकाला काहीतरी संशय आला. त्याने बसच्या चाकाची पाहणी सुरु केली. तेव्हा बसच्या मागच्या चाकाचे चार बोल्ट निखळल्याचे लक्षात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने होत असलेल्या वाहनांच्या तपासणीने शिवशाही बसमधील तब्बल ३० ते ३५ प्रवाशांचे प्राण वाचले. बसच्या चाकाचे बोल्ड निखळले होते, परंतु कुणालाही याची कल्पना नव्हती. तपासणी नाक्यावर बस थांबताच हा प्रकार लक्षात आला आणि मोठा अनर्थ टळला.
भंडारानजीकच्या जवाहरनगर येथे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने स्थिर पथक पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते. बुधवारी सकाळी १२ वाजताच्या सुमारास तपासणीसाठी नागपूर-भंडारा शिवशाही बस थांबविण्यात आली. पोलीस प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करीत होते. त्याचवेळी चालकाला काहीतरी संशय आला. त्याने बसच्या चाकाची पाहणी सुरु केली. तेव्हा बसच्या मागच्या चाकाचे चार बोल्ट निखळल्याचे लक्षात आले. बस साधारणत: ६० ते ७० च्या वेगाने धावत होती. तपासणी नाक्यावर बसला थांबविले नसते तर उर्वरीत बोल्टही निखळून चाक निघाले असते आणि मोठा अनर्थ झाला असता.
प्रवाशांना हा प्रकार माहित होताच अनेकांच्या जीवाचे पाणी झाले. त्यानंतर प्रवाशांना मागाहून आलेल्या बसमध्ये भंडाराकडे रवाना करण्यात आले. सुदैवाने मोठा अपघात टळल्याने अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
देखभालीकडे दुर्लक्ष
आगारातून शिवशाही बस निघण्यापूर्वी कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे या घटनेने स्पष्ट होते. प्रवाशांच्या जीवाशी हा एक प्रकारचा खेळच म्हणावा लागेल.