पोलीस काका, तुम्ही गुन्हेगारांना खरंच मारता का? एफआयआर म्हणजे काय हो?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 09:25 PM2018-12-16T21:25:27+5:302018-12-16T21:25:53+5:30
पोलीस काका, तुम्ही गुन्हेगाराला खरंच मारता का, एफआयआर कशाला म्हणतात, गुन्हा घटल्यावर तक्रार कशी नोंदविली जाते असे एक ना अनेक बालसुलभ प्रश्नांचा पोलिसांवर विद्यार्थ्यांनी भडीमार केला.
राजू बांते।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : पोलीस काका, तुम्ही गुन्हेगाराला खरंच मारता का, एफआयआर कशाला म्हणतात, गुन्हा घटल्यावर तक्रार कशी नोंदविली जाते असे एक ना अनेक बालसुलभ प्रश्नांचा पोलिसांवर विद्यार्थ्यांनी भडीमार केला. भल्ल्याभल्या गुन्हेगारांना वठणीवर आणणाऱ्या मोहाडी पोलिसांनाही या मुलांची उत्तरे देताना क्षणभर का होईना विचार करावा लागला. निमित्त होते मोहगाव देवी येथील महात्मा ज्योतीबा फुले शाळेच्या ‘संवाद क्षेत्र भेट’ उपक्रमाचे.
खाकी वर्दीचा गुन्हेगाराशी संवाद ऐकण्याची सवय झालेल्या पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांचा किलबीलाट पाहून अनेकांना आश्चर्य वाटत होते. मोहाडी पोलीस ठाण्यात चिमुकल्यांची भरलेली ही शाळा आणि धिटाईने विचारलेले प्रश्न चर्चेचा विषय झाला होता. विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज प्रत्यक्षपणे कसे चालते हे पाहण्याची संधी या निमित्ताने मिळाली. पोलिसांबद्दल लहान मुलांमध्ये भितीयुक्त कुतूहल असते. त्यामुळेच पोलीस अधिकारी आणि विद्यार्थ्यांचा मुक्त संवाद व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. मोहगाव देवी शाळेचे विद्यार्थी तीन किमीचे अंतर पायी पार करुन शिस्तबध्द पध्दतीने मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचेही स्वागत केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक बंडू थेरे, लोकमतचे प्रतिनिधी सिराज शेख, मुख्याध्यापक राजू बांते, धनराज वैद्य, हंसराज भडके, हेमराज राऊत, गजानन वैद्य, शोभा कोचे, मोहन वाघमारे आदी उपस्थित होते.
पोलीस ठाण्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे चेहºयावरुन स्पष्ट दिसत होते. त्यानंतर थेट विद्यार्थ्यांचा पोलिसांशी संवाद सुरु झाला. गुन्हा झाल्यावर पोलीस मार देतात काय? एफआयआर कशाला म्हणतात, पोलीस होण्यासाठी काय करावे लागेल असे बालसुलभ प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले. या प्रश्नाना पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, उपनिरीक्षक बंडू थेरे, शिपाई पवित्रा शरणागते यांनी उत्तरे दिली. एवढेच नाही तर एखादा गुन्हा घडला तर त्याचा प्रतिकार कशा करावा, आपतकालीन परिस्थिती कशी हाताळावी याचेही मार्गदर्शन पोलिसांनी दिले. या मुक्त संवादातून विद्यार्थ्यांना पोलीस खात्याविषयी माहिती मिळाली व जवळीकता वाढली, स्रेह साधता आला. नवव्या वर्गाची विद्यार्थीनी रुचीका भडके हिने ‘संधीचे सोने कसे करावे’ या विषयी बोधकथेतून माहिती दिली.
यावेळी पोलीस शिपाई अल्का चोटमोर, संगिता वाघमोडे, नामदेव धांडे, सहायक फौजदार सुनील केवट, पोलीस मिथुन चांदेवार, युवराज वरखडे, संजय बडवाईक, तांडेकर, विक्रम आसेले, गभने, आशिष तिवाडे, मिताराम मेश्राम, मंजु बांते, हुकूमचंद आस्वले आदी उपस्थित होते.
कोठडी बघितली जवळून
या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्याचे कामकाज कसे चालते. हे सांगण्यासाठी ठाण्यातील प्रत्येक कक्षाची माहिती देण्यात आली. बिनतारी संदेश यंत्रणा, मुद्देमाल कक्ष, अधिकारी कक्ष आणि पोलीस कोठडी अगदी जवळून बघितली. विस्फारलेल्या डोळ्यांनी विद्यार्थी पोलीस कोठडी बघत होते.