पोलीस लाईफ.... ना ड्यूटीची वेळ ..ना आराम करण्यास मिळतो वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:37+5:302021-02-13T04:34:37+5:30
भंडारा : जनतेची सुरक्षा हेच आपले पहिले कर्तव्य समजून ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याची सतत जाणीव ठेवून पोलीस आपले ...
भंडारा : जनतेची सुरक्षा हेच आपले पहिले कर्तव्य समजून ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीद वाक्याची सतत जाणीव ठेवून पोलीस आपले कर्तव्य निभावतात. मात्र या पोलिसांची दैनंदिन लाइफ दिसते तेवढी सोपी नाही. जिल्हा पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या १५४४ पोलीस कर्मचाऱ्यांना ना ड्यूटीची निश्चित वेळ आहे, ना त्यांना आपल्या कुटुंबासोबत आराम करण्यासाठी वेळ मिळत आहे. पोलीस ठाण्यातील ऑफिशियल स्टाफ सोडला तर इतर पोलीस कर्मचाऱ्यांना मात्र ड्यूटीची निश्चित अशी कोणती वेळ नाही. प्रत्यक्ष ड्यूटीचे तास बारा तास ठरले असले तरी प्रत्यक्षात मात्र चौदा तासांची किंवा कधीकधी तर यापेक्षाही जास्त तासांची ड्यूटी करावी लागते. मात्र यातील काही विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना २४ तास ड्यूटी साठी सतर्क राहावे लागते. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या अग्निकांड प्रकरणामुळे गेल्या दोन महिन्यापासून भंडारा पोलीस सातत्याने मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सतर्क राहात आहेत. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना गेल्या दीड ते दोन महिन्यात सुट्टीही घेता आलेली नाही. या व्यतिरिक्त जिल्ह्यात पार पडलेले मतदान, मोर्चे, आंदोलने, बंद, राजकीय सभा, यात्रा, विविध मंत्र्यांचे झालेले दौरे या सर्व कारणांनी पोलीस सातत्याने व्यस्त राहिले आहेत. या व्यतिरिक्त शहरासह ग्रामीण भागात घडणारे दारूचे गुन्हे व वाढलेल्या गुन्ह्याच्या तक्रारी याबाबत पोलिसांना आपले कर्तव्य नेहमीच रात्री अपरात्रीही निभावावे लागते. भंडारा जिल्ह्यात एकूण १७ पोलीस ठाणे आहेत. जिल्ह्यात १५४४ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. त्या तुलनेत जिल्ह्याची लोकसंख्या अकराव्या जनगणनेनुसार १२ लाख ३३४ इतकी आहे. पोलिसांना वैयक्तिक जीवनातही प्रथम प्राधान्य नोकरीलाच द्यावे लागते. कोणतीही गोष्ट वरिष्ठांना विचारल्याशिवाय करता येत नाही अशी माहिती आहे. याशिवाय इतर शासकीय कर्मचारी आंदोलने, मोर्चे, निषेध करू शकतात. मात्र आम्हाला तीही संधी मिळत नाही. एवढेच काय तर स्वतःचे वैयक्तिक मेडिकल बिल किती दिवसांपासून प्रलंबित आहे मात्र याबाबत विचारणाही करता येत नाही. वरिष्ठांचा आदर तसेच कार्यालयीन शिस्तीला पोलीस विभागात फार महत्त्व आहे. त्यामुळे कधी कोणती घटना घडेल आणि वरिष्ठांचा कधी निरोप येईल याची शाश्वती नसते. तत्काळ पोलीस स्टेशनला हजर राहावे लागते. अनेकदा कुटुंबात पत्नी, मुलांना संध्याकाळी घरी पोहचत नाही तोपर्यंत कधी घरी येईल असे सांगता येत नाही. कधी काही कार्यक्रमानिमित्त आश्वासन दिले तर नेमके त्या दिवशीच कोणतीतरी घटना घडलेली असते. त्यामुळे गेल्या काही वर्षात कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता आला नसल्याचेही अनेकांनी सांगितले. त्यामुळे अलीकडे पोलिसांवरील ताण तणाव वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, वाहनांची संख्या व त्या तुलनेत पोलिसांचे असणारे मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे पोलिसांना आरोग्यासह विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
बॉक्स
पोलिसांची ड्यूटी बारा तासांची
प्रत्यक्षात पोलीस दादांची ड्यूटी बारा तासांची असते. मात्र, कार्यालयीन कर्मचारी वगळता इतर कर्मचाऱ्यांना बारा तासापेक्षाही जास्त तास ड्यूटी करावी लागते. काही विभाग असे आहेत की तेथे २४ तास अलर्ट राहावे लागते.
बॉक्स
मुलांच्या शिक्षणाकडे होते दुर्लक्ष
पंचवीस ते तीस वर्ष सेवा केलेले पोलीस कर्मचारीही अनुभव कथन करताना मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. पुरेसा वेळ मुलांना मला देता आला नाही. नोकरी निमित्ताने अनेक ठिकाणी जावे लागत असल्याने मुलांना अभ्यासात मदत करता आली नाही.
बॉक्स
कुटुंबासाठी मोजकाच वेळ
पोलीस कर्तव्य निभावताना कुटुंबासाठी फारसा वेळ देऊ शकत नाहीत. ड्यूटीनंतर आल्यावर घरातील काही कामे करतानाच दिवस संपून जातो. त्यामुळे कुटुंबाला फारसा वेळ देता येत नाही.
बॉक्स
अनेक कर्मचारी शासकीय घरात वास्तव्यास
गेल्या काही वर्षांपासून पोलिसांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन अनेक गृहमंत्र्यांनी दिले. मात्र प्रत्यक्षात आजही अनेक पोलिसांची स्वतःची घरे नाहीत. काही जण भाड्याच्या घरात राहतात तर काहींना शासकीय सदनिकांचा आधार घ्यावा लागत आहे.
कोट
अनेक सणवार उत्सव पतीविनाच साजरे झाले. पती सकाळी नऊला नोकरी निमित्ताने बाहेर पडतात. रात्री कधी अकरा, दहा, सात वाजता परत घरी येतात. अनेकदा वेळेवर येण्याचे आश्वासन देऊनही ते कामामुळे कधीच वेळेवर येऊ शकत नाहीत. कुटुंब प्रमुखालाच कुटुंबीयांसोबत सुख दुःखाचे क्षण घालवता येत नाहीत. ही पोलीस कुटुंबीयांसाठी सोपी गोष्ट नाही. लहानपणी वडिलांना मुलांच्या सहवासाची गरज असते. मात्र आपल्या मुलांसाठीही पोलीस पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. मुले मोठी झाली पण त्यांचे बालपण पुन्हा येणार नाही.
मीना हटवार, पोलीस पत्नी, भंडारा