अध्यक्षांसह आठ संचालकांना पोलिसांची नोटीस

By admin | Published: February 7, 2016 01:23 AM2016-02-07T01:23:55+5:302016-02-07T01:23:55+5:30

जलाशयात रितसर बोटींग व्यवसायाची मंजुरी नसताना छुप्या मार्गाने व्यवसाय सुरु केल्या प्रकरणी चांदपूरच्या मागासवर्गीय मत्स्यपालन संस्थेच्या अध्यक्षांसह

Police notice to eight directors including chairman | अध्यक्षांसह आठ संचालकांना पोलिसांची नोटीस

अध्यक्षांसह आठ संचालकांना पोलिसांची नोटीस

Next

रंजित चिंचखेडे चुल्हाड
जलाशयात रितसर बोटींग व्यवसायाची मंजुरी नसताना छुप्या मार्गाने व्यवसाय सुरु केल्या प्रकरणी चांदपूरच्या मागासवर्गीय मत्स्यपालन संस्थेच्या अध्यक्षांसह आठ संचालकांना सिहोरा पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यामुळे संचालकात खळबळ माजली आहे. परंतु फौजदारी कारवाई व डोंगा जप्तीची कारवाईकरिता पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला नाही, अशी माहिती मिळाली आहे.
मासोळी उत्पादनासाठी वर्षभरासाठी चांदपूर जलाशय मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्थेला लिजवर देण्यात आलेला आहे. ३६ फुट खोल असणाऱ्या या जलाशयात मासोळी उत्पादन क्षमता १०.६६ लाख मी. टन इतकी आहे. मासेमारी करण्याचे अधिकार याच संस्थेला आहेत. मासेमारी करण्याकरिता डोंगा उपयोगात आणले जात आहे. परंतु या डोंग्याचा भलताच उपयोग संस्था अध्यक्ष यांनी सुरु केला आहे. या जलाशात डोंग्यातून बोटींग व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे. या डोंग्याला बोटींगच्या धर्तीवर आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे. डिझेल इंजिन लावण्यात आले असून हा डोंगा नागपुरच्या सहकाऱ्यांच्या मदतीने खरेदी करण्यात आलेला आहे. ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळ नावलौकीक असल्याने पर्यटकांची हजेरी सुरु झाली आहे. या पर्यटकांची भ्रमंती डोंग्यातून जलाशयात केली जात आहे. याकरिता प्रती व्यक्ती ३० रुपये घेण्यात येत आहे. हा प्रकार गेल्या सहा महिन्यापासून भरदिवसा जलाशयात सुरु आहे. जलाशय पाटबंधारे विभागाच्या अधिकार क्षेत्रात आहे. जलाशयाची देखभाल व नियंत्रणाची जबाबदारी याच विभागाची आहे.
यापूर्वी जलाशयातून डोंग्यातून करण्यात येणारा बोटींग व्यवसाय बंद करण्याची सूचना पाटबंधारे विभागाने अध्यक्ष शांताराम शहारे यांना दिली आहे. या अनधिकृत व्यवसायावर आळा घालण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत जलाशय परिसरात कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. परंतु कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कर्मचाऱ्यांना हटविण्यात आले आहे. जलाशय परिसर मोकाट सोडताच अध्यक्षांनी पुन्हा छुप्या मार्गाने अनधिकृत बोटींग व्यवसाय सुरु केला आहे.
दरम्यान पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी जलाशय परिसरात दिसताच पर्यटकांना घेवून ३६ फुट खोल जलाशयात कारवाईच्या भीतीने पळवापळवी करण्यात येत आहे. यामुळे पर्यटकांचा जीव भांड्यात अडकत आहे. जलाशय परिसरात अनधिकृत बोटींग व्यवसायावर कायमस्वरुपी बंदी आणण्यासाठी पाटबंधारे विभागाने अत्याधुनिक असणाऱ्या डोंगा ताब्यात घेतला नाही.
फक्त कागदी घोडे नाचवून वेळ मारून नेली जात आहे. याशिवाय चोरीच्या मार्गाने हा व्यवसाय सुरु असताना फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पाटबंधारे विभागाने तक्रार दिली नाही. यामुळे राजरोसपणे खुलेआम बोटींग व्यवसाय सुरु ठेवण्यात येत आहे. पाटबंधारे विभागाची भूमिका खटकणारी दिसत असल्याने ताशेरे ओढली जात आहे. पर्यटकांच्या जीवाचा खेळ मांडला जात आहे.
दरम्यान, चांदपूर जलाशयात बोटींग व्यवसाय करण्यासाठी रितसर परवानगी घेण्यात आली नाही. तसे मंजुरीपत्र नाही. गैरमार्गाने हा व्यवसाय सुरु करण्यात आलेला आहे. जलाशयात अनुचित प्रकार व घटना घडल्यास संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळाला जबाबदार धरण्यात येणार आहे. यामुळे सिहोरा पोलीस स्टेशन अंतर्गत १४९ जा.फो. अन्वये मागासवर्गीय बहुउद्देशिय मत्स्यपालन सहकारी संस्था चांदपूरचे अध्यक्ष शांताराम शहारेसह अन्य ८ संचालकांना नोटीस बजावली आहे. यामुळे संचालकात खळबळ माजली आहे. परंतु संस्थेचे अध्यक्ष यांनी नोटीसांना ठेंगा दाखविला असल्याची माहिती मिळाली आहे.

पर्यटनस्थळाचे काय?
ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळांची मंज़ुरी अडली आहे. शासनाच्या प्रक्रियांना गती नाही. आॅगस्ट २०१२ पासून पर्यटनस्थळ बंद असताना राज्य शासनाचा महसूल बुडत आहे. याशिवाय पर्यटनस्थळात दाखल होणारे पर्यटक असुरक्षित असून बोटींग व्यवसायात त्यांची लुट होत आहे. त्यांचे हौस आणि जीवीताला धोका निर्माण झाला आहे. जलाशयात अनुभवरहीत भ्रमंती जीवावर बेतणारी असताना यंत्रणा बेफिकीर आहे. यामुळे पर्यटनस्थळाचा प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्याची गरज आहे.

Web Title: Police notice to eight directors including chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.