‘थर्टी फर्स्ट’वर पोलिसांची करडीनजर
By admin | Published: December 27, 2014 10:46 PM2014-12-27T22:46:37+5:302014-12-27T22:46:37+5:30
थर्टी फर्स्टला दारू पिऊन कुठेही धिंगाणा घालाल तर सावधान. याशिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात किंवा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही,
भंडारा : थर्टी फर्स्टला दारू पिऊन कुठेही धिंगाणा घालाल तर सावधान. याशिवाय दारूच्या नशेत वाहन चालविणेही महागात पडणार आहे. ३१ डिसेंबर रोजी शहरात किंवा जिल्ह्यात अनुचित प्रकार घडणार नाही, याची विशेष दक्षता पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. या दिवशी मद्यपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधीत पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई ठिकठिकाणी जल्लोष करतात. जिल्ह्यात यादिवशी मोठ्या प्रमाणात हॉटेल्स व ढाब्यांवर मद्य विक्री होते. यावर आळा घालण्याकरिता या हॉटेल्स मालकांना नोटीस बजावण्यात आले आहेत.या हॉटेलात पार्टी करण्यासाठी तरुणवर्ग दुचाकीने हुल्लड करीत येतात. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावते. मद्यधुंदीत वाहन चालविणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत. या दिवसाच्या कारवाईकरिता पोलिसांच्या विशेष पथकाचे गठन केले असून त्यांना कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबर साजरा करताना प्रत्येकांनी भान राखून उत्सव साजरा करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल, असे होऊ देऊ नका.
(शहर प्रतिनिधी)