भरधाव एस.टी. बसच्या धडकेत पोलीस ठार; भंडाऱ्यातील घटना, तासभर वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 04:16 PM2022-06-13T16:16:05+5:302022-06-13T16:25:24+5:30
धडक एवढी भीषण हाेती की एस. टी. बसच्या रेडियेटरवर आदळून धुलीचंद दुचाकीसह बसच्या समाेरील चाकाखाली आले.
भंडारा : भरधाव एस.टी. बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार पाेलीस ठार झाल्याची घटना भंडारा शहरातील अत्यंत वर्दळीच्या राजीव गांधी चाैकात साेमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. एस.टी.ने दुचाकीला मागून धडक दिल्याने चाकाखाली येऊन गंभीर जखमी झालेल्या पाेलिसाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातस्थळी माेठी गर्दी झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली हाेती.
धुलीचंद गाेदु बरवैय्या (४७, रा. नेहरू वाॅर्ड, मेंढा, भंडारा) असे मृताचे नाव आहे. ते गाेंदिया जिल्ह्यातील तिराेडा पाेलीस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत हाेते. मूळ भंडाराचे असलेले धुलीचंद सुटीवर आले हाेते. साेमवारी सकाळी काही साहित्य खरेदीसाठी ते राजीव गांधी चाैकात आले हाेते. त्यावेळी भंडारा आगाराच्या रामटेक बसने भरचाैकात दुचाकीला (एमएच ३६ ए एफ १६९१) जबर धडक दिली. धडक एवढी भीषण हाेती की एस. टी. बसच्या रेडियेटरवर आदळून धुलीचंद दुचाकीसह बसच्या समाेरील चाकाखाली आले. अपघात झाल्याचे दिसताच उपस्थित नागरिकांनी त्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, जबर दुखापत झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.
तासभर वाहतूक ठप्प
भंडारा - रामटेक राष्ट्रीय महामार्गावर राजीव गांधी चाैकात अपघात झाल्यानंतर तासभर वाहतूक ठप्प झाली हाेती. अपघातग्रस्त एस.टी. बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बस दुसरीकडे हलविणेही कठीण झाले हाेते. परिणामी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत या परिसरात वाहतूक ठप्प झाली. चौकात चारही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या हाेत्या. शहर ठाणेदार सुभाष बारसे, जिल्हा वाहतूक शाखेचे पाेलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्यासह वाहतूक पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तासभरानंतर वाहतूक सुरळीत झाली.