पोलीस पाटलांच्या पाठीवर शाबासकीची थाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:05 PM2018-01-02T23:05:21+5:302018-01-02T23:05:41+5:30
प्रशांत देसाई ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : गावात घडणाऱ्या गुन्ह्यांसह अन्य माहितींची खडान्खडा माहिती पोलीस विभागाला देण्याची महत्वाची भूमिका गावातील पोलीस पाटील पार पडत आहेत. मात्र, नावातच ‘पाटीलकी’ भूषविणाऱ्या या पोलीस पाटलांचा पोलीस विभागाने कधीही गौरव केला नाही. ही परंपरा यावर्षी भंडारा पोलीस विभागाने मोडीत काढली आहे.
लाखनी येथील कार्यक्रमात साकोली, लाखनी व पालांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे २५० पोलीस पाटलांचा सहृदय सत्कार करण्यात आला. पोलीस पाटलांचा सत्कार करण्याचा हा राज्यातील पहिला उपक्रम ठरला आहे.
गावातील तंटे गावातच मिटावे यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.आर.आर. पाटील यांच्या कल्पनेतून गावस्तरावर तंटामुक्त गाव समिती स्थापन करण्यात आली आहे. तंटामुक्त समिती आली तेव्हापासून या समितींवर प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत असून त्यांना गौरविण्यातही येते. मात्र, पूर्वापारपासून प्रत्येक गावात पोलीस पाटीलांची नियुक्ती करण्याची परंपरा आजही अबाधित आहे. मात्र इमानेइतबारे काम करणाºया पोलीस पाटलांच्या कार्याची दखल आजपर्यंत पोलीस प्रशासनाने घेऊन त्यांचा सत्कार केल्याचे कधीच बघायला मिळाले नाही. पोलीस पाटलांची ही व्यथा यावर्षी भंडारा पोलीस विभागाने समजली.
साकोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांच्या पुढाकारातून साकोली उपविभागातील लाखनी, साकोली व पालांदूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुमारे २५० पोलीस पाटलांचा सहृदय सत्कार लाखनी येथे सोमवारला पार पडला. यातून पोलीस पाटलांना प्रेरणा मिळाली आहे. या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपविभागीय अधिकारी अर्चना मोरे, लाखनीचे तहसीलदार रविंद्र राठोड, साकोलीचे तहसीलदार अरविंद हिंगे, लाखनीचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत चकाटे, साकोलीचे पोलीस निरीक्षक आर. पिपरेवार, पालांदुरचे अंबादास सुनगार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष परशुरामकर यांच्या उपस्थितीत पोलीस पाटलांचा गौरव करण्यात आला.
पोलीस पाटील हे गावातील प्रतिष्ठेचे पद असून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा पोलीस पाटलांना दुपटीने अधिकार देण्यात आले आहे. सामाजिक तथा धार्मिक एकोपा जोपासलेल्या पोलीस पाटलांचा हा सोहळा भविष्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे.
- विनिता साहू, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा.
गावात राहून पोलीस विभागाला वेळोवेळी गुन्हेगारीची माहिती देणाऱ्या पोलीस पाटलांच्या कार्याची दखल घेणे गरजेचे आहे. या गौरवामुळे त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळेल सोबतच पोलिसांप्रती आदर वाढून सलोखा निर्माण होईल. पोलीस पाटलांच्या प्रेरणेतून गुन्हेगारांवर अंकूश ठेवण्यासाठी सहकार्य मिळेल.
- श्रीकांत डिसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, साकोली.