पोलिसांनी रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:43 AM2018-03-02T00:43:53+5:302018-03-02T00:43:53+5:30
दोन लाख रूपयात विकण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा येथील एका मंदिरात जबरदस्तीने होणारा विवाह पोलिसांच्या समयसुचकतेमुळे रोखण्यात आला.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : दोन लाख रूपयात विकण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीचा येथील एका मंदिरात जबरदस्तीने होणारा विवाह पोलिसांच्या समयसुचकतेमुळे रोखण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीची मावशी, ज्याच्यासोबत लग्न होणार होते तो तरूण आणि त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
भंडारा येथील रहिवाशी असलेली ही अल्पवयीन मुलीच्या मावशीने पुणे येथील रहिवासी राजेंद्र घुले (२५) याला दोन लाख रूपयांत विकले होते. आणि येथील एका मंदिरात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती.
दरम्यान याची माहिती काही लोकांनी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांना दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस निरिक्षक सुरेशकुमार घुसर, सहायक पोलीस निरीक्षक विजय पोटे यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा मंदिरात पोहोचला. तिथे पोलिसांनी या लग्नाची तयारी रोखली.
या कारवाईनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगी, तिची मावशी, होणारा पती आणि त्याच्या दहा नातेवाईकांना ताब्यात घेतले. आता त्यांची चौकशी सुरू आहे.
अल्पवयीन मुलीचा विवाह थांबवून होणारा गुन्हा रोखने हा पोलिसांचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू असून अल्पवयीन मुलीला बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे.
- सुरेशकुमार घुसर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा.