कोंबड बाजारावर पोलिसांची धाड; सहा जणांना अटक, कोंबड्यांसह कात्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 04:21 PM2022-11-18T16:21:06+5:302022-11-18T16:22:27+5:30
थेरकर टोलीतील घटना
चुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगांतील जंगलातील थेरकर टोलीत सुरू असलेल्या कोंबड बाजारावर बुधवारी सिहोरा पोलिसांनी धाड घातली घालून कोंबड्यांची झुंज लावणाऱ्या सहा जणांना अटक केली. तर पाच जण पसार झाले. पोलिसांनी कोंबड्यांसह कात्या जप्त करण्यात आल्या. यामुळे कोंबड बाजार शौकिनाचे धाबे दणाणले आहेत.
सोनू तेजराम गौपाले (३५) वर्ष, रा. मांगली, मधू मोहन गौपाले (७०) वर्ष रा. नाकाडोंगरी, सचिन विनायक चव्हाण (४०) वर्ष, रा. भंडारा, टिंकू पराते रा. सिहोरा, शुभम हेडाऊ (३८) वर्ष रा. सिहोरा, प्रमुख सूत्रधार जितू थेरकर (४०) वर्ष रा. थेरकरटोली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
सिहोरा परिसरातील जंगलात अनेक महिन्यांपासून कोंबड बाजार सुरू आहेत. पोलिसांनी धाड घालण्याचे प्रयत्न केले होते. परंतु कोंबड बाजारात जुगार खेळणारे शौकिन वारंवार स्थळ बद्दलवित होते. परंतु बुधवारी पोलिसांनी थेरकर टोलीतील कोंबड बाजारात धाड घातली. यात ३ कोंबडे आणि कात्या जप्त करण्यात आल्या आहेत. पाच जण पासर झाले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी केली आहे.
मध्यप्रदेशातील शौकिनांची हजेरी
दर बुधवार आणि शुक्रवारी सुरू असणाऱ्या या कोंबड बाजारात मध्यप्रदेशातील बालाघाटसह गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शौकीन हजेरी लावत असल्याची माहिती आहे. अनेक वर्षांपासून थेरकर टोलीवरील कोंबड बाजार चर्चेत आहे. वन विभागाच्या राखीव जंगलात सुरू असणाऱ्या कोंबड बाजाराची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना नसल्याने चर्चाना पेव फुटले आहे.