पोलिसांनी मैत्री भावनेने जनतेला सेवा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:26+5:302021-02-05T08:42:26+5:30
दिघोरी/मोठी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे लोकार्पण २८लोक २२ के दिघोरी/मोठी -प्रशासकीय व्यवस्था लोकाभिमुख होण्यासाठी जनता भयमुक्त होणे गरजेचे आहे.जनतेच्या मनात ...
दिघोरी/मोठी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे लोकार्पण
२८लोक २२ के
दिघोरी/मोठी -प्रशासकीय व्यवस्था लोकाभिमुख होण्यासाठी जनता भयमुक्त होणे गरजेचे आहे.जनतेच्या मनात पोलिसांप्रती असलेली नकारात्मक भावना दूर करतांना अन्यायी व्यवस्था संपली पाहिजे असे सांगत पोलिसांनी मैत्री भावनेने जनतेला सेवा देण्याचे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. तालुक्यातील दिघोरी/मोठी येथील पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
पटोले म्हणाले, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन पोलीस प्रशासन काम करीत असले तरी जनतेच्या मनात पोलिसांप्रती नकारात्मक भावना दिसून येते.समाजातील प्रत्येकाचे रक्षण करतांना पोलिसांनी अन्यायी व्यवस्थेला देखील संपविले पाहिजे. जनतेच्या मनात असलेली भीती दूर होण्यासाठी पोलिसांनी प्रशासकीय व्यवस्थेतील प्रमुख घटक म्हणून लोकाभिमुख होणे गरजेचे असल्याचे देखील सांगितले. तथापि ग्रामीण भागातील बेरोजगार युवक प्रशासकीय सेवेत दाखल होण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय अभ्यासिका केंद्र तर तालुक्याच्या ठिकाणी भव्य अभ्यासिका केंद्र निर्मिती केली जाणार असल्याचे म्हटले. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने यावेळी विधानसभा अध्यक्षांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत पुढील वाटचालीसाठी पोलीस प्रशासनाला शुभेच्छा दिल्या. सुमारे ६२ लक्ष रुपये निधी खर्चून बांधण्यात आलेल्या पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत लोकार्पण कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू, सरपंच अरुण गभने, सा.बां.उपअभियंता मटाले, कनिष्ठ अभियंता अरुण करंजकरश, कंत्राटदार राजेश कोट्टेवार, माजी पं.स.सदस्य गुलाब कापसे, सेवानिवृत्त ठाणेदार यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे, तेजस सावंत, पोलीस उपनिरीक्षक ग्यानीराम गोबाडे, अमरदीप खाडे यासह अन्य अधिकारी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. संचालन दरारे यांनी केले तर आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गावंडे यांनी मानले.
पोलीस भरती प्रशिक्षणार्थ्यांना सर्वतोपरी मदत
ग्रामीण भागातील युवकांना प्रशासकीय सेवेत रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील लाखांदूर,पालान्दूर,गोबरवाही यासह अन्य काही पोलीस ठाण्यांतर्गत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात आहे. गोर-गरीब विद्यार्थी युवकांना ॲकेडमी अंतर्गत प्रशिक्षण घेणे सोयीचे ठरत नसल्याने पोलीस विभागाने मोफत प्रशिक्षण चालविले आहे.या प्रशिक्षण शिबिराला ग्रामीण युवकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्यानुसार या प्रशिक्षणार्थ्यांना लेखी परीक्षा व मैदानी चाचणी प्रशिक्षण घेताना आवश्यक साहित्य,तज्ज्ञ मार्गदर्शक,प्रशिक्षक व अभ्यासासाठी लागणारी सर्व पुस्तके विनामूल्य उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे सांगत येत्या १ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी व दर आठवड्याला एक सराव परीक्षा घेऊन सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी यावेळी दिले.