पोलीस चौकी बंद; रेती घाटावर तस्करांचा धुमाकूळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2022 11:10 PM2022-10-06T23:10:07+5:302022-10-06T23:11:02+5:30
सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी थांबविण्याकरिता मोठा गाजावाजा करून तुमसर तालुक्यातील सुकडी देवाडी व तामसवाडी सेवरा येथील रेती घाटावर पोलीस चौकी उभारली होती.
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मोठा गाजावाजा करून सुकळी ( दे.) व तामसवाडी (सी.) येथे रेतीचोरी थांबविण्याकरिता पोलीस चौकी उभारण्यात आली होती. परंतु मागील चार दिवसांपूर्वी येथील पोलीस चौकी बंद केल्याने रेती तस्कर पुन्हा साखरे झाले असून या दोन्ही रेती घाटांवर रेती तस्करांचा धुमाकूळ सुरू आहे.
सुकडी (देव्हाडी) येथे ट्रॅक्टर चालकाकडून प्रति ट्रॅक्टर महिन्याला दहा हजार रुपयांची मागणी केली जात असून, त्यांना रेती घाटावर मज्जाव करण्यात आला आहे. येथील स्थानिक रेती तस्करांची दादागिरी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
महसूल व पोलीस प्रशासनाने रेतीचोरी थांबविण्याकरिता मोठा गाजावाजा करून तुमसर तालुक्यातील सुकडी देवाडी व तामसवाडी सेवरा येथील रेती घाटावर पोलीस चौकी उभारली होती.
पंधरा ते वीस दिवस या गटातून त्यांची चोरी बंद झाली होती. चार दिवसांपूर्वी अचानक येथील पोलीस चौकी बंद करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही रेती घाटांवर रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे दिसून येते.
इतर घाटातही तीच स्थिती
- तुमसर तालुक्यातून वैनगंगा व बावनथडी नदी वाहते. या दोन्ही नद्यांच्या नदीपात्रात उच्च गुणवत्तेचा रेतीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे रेती तस्करांची नजर या रेती घाटाकडे आपसूकच आहे. येथील रेतीला मध्य प्रदेशात व नागपूर येथे मोठी मागणी आहे. तुमसर तालुक्यात सुकडी ( दे.) तामसवाडी (सी.) चारगाव, ढोरवाडा, माडगी, उमरवाडा, बपेरा, वारपिंडकेपार, आष्टी, चांदमारा, नाका डोंगरी येथे रेती घाट असून केवळ उमरवाडा येथील रेती घाटाचा शासनाने लिलाव केला आहे. परंतु तोही सध्या बंद असल्याची माहिती आहे. उर्वरित रेती घाटातून रेतीचोरी करण्यात येते.
ट्रॅक्टर चालकाकडून मागणी
- सुकळी (दे.) येथे वैनगंगा नदीचे पात्र विस्तीर्ण असून येथे उच्च दर्जा असलेल्या रेतीचा मोठा साठा उपलब्ध आहे. येथे ट्रॅक्टर चालकाकडून महिन्याला दहा हजारांची मागणी एका स्थानिक व्यक्तीने केली आहे. त्या व्यक्तीची येथे दादागिरी सुरू आहे. एक स्थानिक रेती तस्कर मात्र मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करीत आहे.