पोलीस ठाणे उद्घाटनाचा मुहूर्त टळला
By Admin | Published: September 12, 2015 12:33 AM2015-09-12T00:33:28+5:302015-09-12T03:14:53+5:30
मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस ठाणेच्या उद्घाटनाचा मुहूर्त पोलीस विभागाचे वतीने ११ सप्टेंबर रोजी ठरविण्यात आला होता.
करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी व वरठी पोलीस ठाणेच्या उद्घाटनाचा मुहूर्त पोलीस विभागाचे वतीने ११ सप्टेंबर रोजी ठरविण्यात आला होता. त्यासंबंधाने मान्यवरांना माहितीही दिली गेली होती. मात्र १० सप्टेंबर रोजी उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आल्याची सबब पुढे करीत सोहळा रद्द करण्यात आला. पुढील तारखेपर्यंत पुन्हा उद्घाटनाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सन १९६२ पासून करडी पोलीस ठाणेची मागणी नागरिकांकडून होत होती. त्या मागणीला सन २०१३-१४ मध्य मंजूरी मिळाली. तब्बल ५३ वर्षानंतर नागरिकांच्या मागणीला न्याय मिळाला. माजी आमदार अनिल बावनकर यांनी त्यासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी करडी पोलीस चौकीच्या जागी पोलीस ठाण्याला मान्यता दिली. याच काळात वरठी पोलीस ठाण्याला सुद्धा मंजुरी प्रदान करण्यात आली. अखेर न्याय मिळाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली गेली. करडी येथे पोलीस चौकी भाड्याच्या घरात आहे. चौकीसाठी गरदेव चौकाजवळील जागा विकत घेतली गेली. परंतु चौकीसाठी बांधकाम झालेले नव्हते. सन २०१४ मध्ये सदर जागेवर चौकीचे बांधकाम करण्यात आले. यात चौकी कार्यालय, दोन निवासस्थाने यांचा समावेश आहे. आज चौकीऐवजी पोलीस ठाणेला मंजुरी मिळाली. जवळपास ५० ते ५२ कर्मचाऱ्यांचा 'स्टॉप' त्यासाठी मंजूर असल्याचे सांगण्यात येते. एवढ्या कर्मचाऱ्यांसाठी निवासाची सोय या ठिकाणी नाही. यासाठी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. वरठी येथेसुद्धा निवासस्थाने व प्रशस्त कार्यालयाची कमतरता आहे. सन १९१३-१४ मध्ये करडी व वरठी पोलीस ठाणेला मंजुरी मिळाली असली तरी उद्घाटनाचा मुहूर्त वर्षभरापासून सापडत नव्हता. अखेर तो मुहुर्त सापडला ११ सप्टेंबर रोजी पोलीस विभागाचे वतीने उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली. पोलिसांची चमू सुद्धा त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी पाठविली गेली. खासदार व आमदार महोदयांबरोबर इतरांना सुद्धा निमंत्रीत केल्या गेले. मात्र दि. १० सप्टेंबर रोजीच उद्घाटनाचा मुहुर्त पुढे ढकलण्यात आला. नवीन मुहूर्तासाठी आता पुढील तारखेची नागरिकांना प्रतिक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)