प्रवासी वाहनधारकांना पोलिसांचा अल्टीमेट
By admin | Published: January 6, 2016 12:44 AM2016-01-06T00:44:52+5:302016-01-06T00:44:52+5:30
तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात काळी-पिवळी या प्रवासी वाहनाने वाहकाला चिरडल्यानंतर जनमानसात संताप दिसून आला.
दस्तऐवजांवर करडी नजर : ४० पैकी २८ प्रवासी वाहने बंद
चुल्हाड (सिहोरा) : तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील बिनाखी गावात काळी-पिवळी या प्रवासी वाहनाने वाहकाला चिरडल्यानंतर जनमानसात संताप दिसून आला. आता त्याचा धसका पोलीस प्रशासन व काळी-पिवळी प्रवासी वाहनधारकांनी घेतला. आवश्यक दस्तऐवज तयार करण्याचा अल्टीमेटम पोलिसांनी काळी-पिवळी प्रवासी वाहनाच्या मालक व चालकांना दिला आहे.
सरत्या वर्षाच्या शेवटी शाळेत जात असताना तुमसर बपेरा राज्य मार्गावर बिनाखी गावात काळी-पिवळी वाहनाने पाच वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. प्रवाशी वाहने भरधाव धावत असल्यामुळे नाहक जीव गमवावा लागत असल्यामुळे बिनाखीवासीयांनी काळी-पिवळी या प्रवासी वाहतूक विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. याशिवाय राज्य मार्गावरुन काळी-पिवळी प्रवासी वाहन गावात शिरणार नाही, असा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. या निर्णयाने पोलीस प्रशासन चांगलेच अडचणीत आले आहे.
दरम्यान तुमसर बपेरा राज्य मार्गावर ४० हून अधिक काळी-पिवळी या प्रवाशी वाहने आहेत. अनेक वाहनांचा विमा नाही, परवाने नाही अन्य दस्तऐवज उपलब्ध नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. वाहकाजवळ परवाना नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या वाहनानी अपघात झाल्यास विमा कंपनीमार्फत मदत दिली जात नाही असे अनेक कारणे निदर्शनास आल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे यांनी प्रवासी वाहतूक करणारे काळी-पिवळी वाहन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे वाहनाचे मालक व वाहक चांगलेच हादरले आहेत. तुमसर बपेरा राज्य मार्गावर प्रवासी वाहतूक करतांना आवश्यक दस्तऐवज आणि पोलीस ठाण्यामध्ये उपलब्ध करण्याचे फर्मान काळी-पिवळी वाहन मालकांना देण्यात आले आहे.
वाहन व प्रवासी, वाहकांचा विमा, परवाना प्राप्त वाहक तथा अन्य वाहतुकीस लागणारे दस्ताऐवज तयार करण्याचे बजाविण्यात आले आहे. असे निर्देश देताच तुमसर बपेरा राज्य मार्गावरील काळी-पिवळी वाहनात कमालीची घट झाली आहे. ४०पैकी फक्त १० ते १२ वाहन या निकष आणि नियमाचे पालन करित असल्याचे निदर्शनास आले आहे. हेच वाहन सद्यस्थित राज्य मार्गावर प्रवासाी वाहतुक करीत आहे. उर्वरित २८ काळी-पिवळी वाहन धारकांनी घरांची वाट धरली आहे. यावरुन अनेक वर्षापासून नादुरुस्त वाहनातून जीव मुठीत घेऊन प्रवाशांनी प्रवास केल्याचे लक्षात येत आहे. अनेक वाहनाचे दरवाजे व अन्य साहित्य भंगारात निघाली आहेत. संपूर्ण वाहन नादुरुस्त असतांना काळी-पिवळी वाहन मालक वेळकाढू धोरण अवलंबित असल्याचे प्रवासी वाहतूक चिंताजनक झाली आहे. (वार्ताहर)