हेल्मेटसक्तीच्या कारवाईला पोलीसही वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 08:52 PM2019-01-06T20:52:43+5:302019-01-06T20:55:22+5:30

विनाहेल्मेट दुचाकी चालकाला जागेवर दंड ठोठवावा तर दबात आणून भानगडीचा सामना. क्रमांक नोंदवून न्यायालयीन कारवाई करावी तर समन्स बजावण्याची जबाबदारी. समन्स तालीम झाला नाही तर दंडाची रक्कम कारवाई करणाऱ्याकडूनच वसूल, अशा अफलातून प्रकाराने भंडारा शहरातील हेल्मेटसक्तीला नागरिकच नाही तर वाहतूक पोलीसही जाम वैतागले आहेत.

Police would also hesitate to take helmets action | हेल्मेटसक्तीच्या कारवाईला पोलीसही वैतागले

हेल्मेटसक्तीच्या कारवाईला पोलीसही वैतागले

Next
ठळक मुद्देकेसेसची सक्ती : दररोज पाच वाहनांचे क्रमांक नोंदविण्याचा बडगा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विनाहेल्मेट दुचाकी चालकाला जागेवर दंड ठोठवावा तर दबात आणून भानगडीचा सामना. क्रमांक नोंदवून न्यायालयीन कारवाई करावी तर समन्स बजावण्याची जबाबदारी. समन्स तालीम झाला नाही तर दंडाची रक्कम कारवाई करणाऱ्याकडूनच वसूल, अशा अफलातून प्रकाराने भंडारा शहरातील हेल्मेटसक्तीला नागरिकच नाही तर वाहतूक पोलीसही जाम वैतागले आहेत.
भंडारा जिल्ह्यात १ डिसेंबरपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हेल्मेट सक्ती करण्यात आली. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. हेल्मेट वापरण्याला कुणाचाही विरोध नाही. हेल्मेट सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकच आहे. हेल्मेट सक्तीच्या नावाखाली नागरिकांची पिळवणुक होऊ लागली आहे. सुरुवातीच्या काही दिवसात विनाहेल्मेट दुचाकी स्वार दिसला की, ठोक ५०० रुपये दंड असा प्रकार सुरु होता. सुमारे १० लाख रुपयांचा दंड जिल्हाभरातून वसुल करण्यात आला. मात्र पोलीस कारवाई करताना भानगडी होतात. नागरिक विविध पध्दतीने दबाव आणतात. त्यामुळे वाहतूक पोलीस अडचणीत आले होते. यावर मात करण्यासाठी गत आठवड्यापासून विना हेल्मेट दूचाकीचे क्रमांक नोंदवायचे आणि थेट न्यायालयातून समन्स बजावायचा निर्णय जिल्हा पोलीस दलाने घेतला. वरवर हा निर्णय योग्य वाटत असला तरी त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य नागरिकांसोबतच वाहतुक पोलिसांनाही होत आहे.
भरधाव दुचाकीचा क्रमांक नोंदविताना पोलिसांकडून क्रमांकातील एक आकडा चुकला तरी दुसºयाच व्यक्तीला समन्स जावू शकतो. क्रमांक लिहिण्याच्या चित्र विचित्र पध्दतीने क्रमांक निट वाचता येत नाही. याचा फटका भलत्याच व्यक्तीला बसू शकतो. मित्राची गाडी काही काळासाठी घेतली व त्याचवेळी पोलिसांनी क्रमांक नोंदविला तर समन्स मात्र गाडी मालकाच्या घरी पोहोचणार. यातून पुन्हा भानगडी निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वाहतूक पोलिसांना दररोज पाच केसेसचे टार्गेट देण्यात आले आहे. विनाहेल्मेटच्या वाहनचालकांचे क्रमांक नोंदवायचे न्यायालयात प्रकरण दाखल करायचे, एवढेच नाही तर तो समन्स तालीम करण्याची जबाबदारीही त्याच वाहतूक पोलिसावर असल्याची माहिती आहे. समन्स तालीम झाला नाही तर दंडाचे पाचशे रुपये वाहतूक पोलिसाला आपल्या खिश्यातून भरण्याशिवाय पर्याय नाही. अशा फटका जिल्ह्यातील काही वाहतूक शिपायांना बसल्याची माहिती आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती करतांना सर्व बाबींचा विचार करुनच कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे.
वाहतूक पोलिसांनी मांडली व्यथा
रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करावी की धावत्या दुचाकीचा क्रमांक नोंदवावा, चुकीचा क्रमांक नोंदविला तर त्याचा फटका आम्हालाच बसणार असे एका वाहतूक शिपायाने नाव छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले. डबडबत्या डोळ्याने हा शिपायी सांगत होता. गत दोन दिवसांपासून ही कारवाई सुरु आहे. आमच्या काही सहकाºयांना खिश्यातून दंड भरावा लागला. ही पाळी आमच्यावर ही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागेवरच दंड ठोठवणे कसे आवश्यक आहे, असे तो सांगत होता.

हेल्मेट सक्तीअंतर्गत दुचाकीचा क्रमांक नोंदविल्यानंतर खात्री केल्यानंतरच संबंधिताला ठाण्यात बोलविण्यात येईल. त्यानंतर दंड भरल्यास कोणतीही कारवाई होणार नाही. मात्र दंड भरण्यास नकार दिला तर न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात येईल.
- बाळकृष्ण गाडे,
जिल्हा वाहतुक शाखा भंडारा

Web Title: Police would also hesitate to take helmets action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.