९५ हजार बालकांना देणार पोलिओची ‘लस’
By admin | Published: March 30, 2017 12:29 AM2017-03-30T00:29:15+5:302017-03-30T00:29:15+5:30
पोलीओ रोगाचे निर्मुलन करण्याच्या दृष्टिने मागील २० वर्ष देशासह राज्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविली जात असून...
१०२२ केंद्र स्थापन : २,४६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती, २ एप्रिल रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा
भंडारा : पोलीओ रोगाचे निर्मुलन करण्याच्या दृष्टिने मागील २० वर्ष देशासह राज्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम यशस्वीपणे राबविली जात असून २०११ ते १४ या कालावधीत पोलीओचा एकही रूग्ण न आढळल्याने भारत पोलीओमुक्त देश झाला आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पल्स पालीओ लसीकरण मोहिम आजही राबविण्यात येत आहे. २०१७ या वर्षातील दुसरा टप्पा २ एप्रिल रोजी राबविला जाणार असून ग्रामीण व शहरी भागातील ९५ हजार ८३८ बालकांना पोलीओचा डोज दिला जाणार आहे.
या मोहिमेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्य कायर्कारी अधिकारी एस. एल. अहिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके, डॉ. सादीक व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा आरोग्य विभागाने यशस्वी केला असून २ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात शहरी व ग्रामीण भागात १,०२२ पोलीओ बुथचे आयोजन करण्यात आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील नियमित लाभार्थी व विटभट्टया, उस तोडणी कामगार स्थलांतरीत वस्त्या, भटकी जमात, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे व जोखमीच्या भागातील लाभार्थी असे ९५ हजार ८३८ बालकांना या मोहिमेमध्ये लस देण्यात येणार आहे. ही मोहिम यशस्वीरित्या राबविण्याकरीता २ हजार ४६३ कर्मचारी व अधिकारी विविध भागात कार्यरत राहणार आहेत. बुथवरचे काम आटोपल्यानंतर शहरी भागात ५ दिवस व ग्रामीण भागात ३ दिवस कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी ६ हजार ६०० व्हॉयल (१ लाख ३२ हजार डोजेस) लसीचा साठा प्राप्त झाला आहे. या करीता आरोग्य विभागातील कमर्चाऱ्याव्यक्तरिक्त महिला व बाल विकास विभागांतर्गत ग्रामीण व शहरी भागात कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा कार्यकर्ती यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. १०० पेक्षा जास्त लाभार्थी असलेल्या केंद्रावर ३ कमर्चारी व १०० पेक्षा कमी असलेल्या बुथवर २ कमर्चाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी भागासाठी २४६३ कमर्चारी २०९ पर्यवेक्षक कार्यरत राहतील.
जागतिक आरोग्य सघटनेने सन १९८८ मध्ये पोलीओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले त्यानुसार राज्यात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलीओ लसीकरण मोहिम दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये ५ वर्षाखाली सर्व बालकांना पोलीओची लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. २१ वर्षे पोलीओ निर्मुलनाकरीता सर्वाचे योगदान लाभत आहे. १३ जानेवारी २०११ नंतर पोलीओ रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळेच भारताला पोलीओ निर्मुलनाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. पोलीओ निर्मुलनाची यशस्वीता विहित वयात प्राथमिक लसीकरण, या आधारस्तंभावर अवलंबून आहे. पोलीओ टाईप-२ जिवाणू १९९९ मध्ये पूर्ण पणे हद्दपार केले आहे. सन २०१० या वर्षात मालेगाव या शहरात चार व बीड जिल्ह्यात एक असे पाच रूग्ण महाराष्ट्रात आढळून आले होते. पल्स पोलीओ मोहिमेचा दुसऱ्या टप्प्यामध्ये बालकांना लस देऊन १०० टक्के मोहिम यशस्वी करावी. एकही बालक पोलीओ लसीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व मुख्य कायर्कारी अधिकारी एस. एल. अहिरे यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)