राजकीय समीकरण, घडामोडी बदलणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 12:36 AM2017-12-09T00:36:34+5:302017-12-09T00:36:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार लक्ष्य करणारे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वजनदार नेते नाना पटोले यांनी शुक्रवारला दुपारी लोकसभा अध्यक्षांकडे खासदारपदाचा राजीनामा सोपविला.
नंदू परसावार।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करणारे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार लक्ष्य करणारे भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील वजनदार नेते नाना पटोले यांनी शुक्रवारला दुपारी लोकसभा अध्यक्षांकडे खासदारपदाचा राजीनामा सोपविला. त्यांच्या राजीनाम्यामुळे भंडारा-गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.
५४ वर्षीय नाना पटोले यांचा आजवरचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा सदस्य व्हाया लोकसभा सदस्य असा कधी काँग्रेस तर कधी भाजप असा राहिलेला आहे. आता ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील, स्वतंत्र आघाडी सुरू करतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
काँग्रेसचे आमदार असताना डिसेंबर २००४ मध्ये पटोले यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावर नागपूर हिवाळी अधिवेशनात राजीनामा दिला होता. त्यानंतर २००९ मध्ये भाजपाचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्त्वात भाजपात प्रवेश करून ते साकोली क्षेत्रातून निवडून आले. त्यावेळी भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांचे राजकीय वर्चस्व होते. त्यावेळी दोन्ही जिल्ह्यात भाजपचे ते एकमेव आमदार होते.
सामाजिकदृष्ट्या संमिश्र असलेल्या भंडारा-गोंदिया जिल्ह्यात कुणबी, पोवार, अनुसूचित जाती, तेली समाजाचे प्राबल्य आहे. त्याचा अचूक लाभ घेत २०१० मध्ये दोन्ही जिल्हा परिषदेतील सत्ता भाजपकडे खेचून आणली होती. त्यानंतर भाजपने प्रफुल पटेल यांच्याविरूद्ध त्यांना उमेदवारी दिली. त्यात ते निवडूनही आले. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणूक ते स्वत: लढतील का? याविषयी साशंकता आहे. विधान परिषद निवडणूक जशी जिंकली तशीच आगामी लोकसभा निवडणूक जिंकणार असे मधल्या काळात त्यांनी सूचक वक्तव्य केले होते. आता पोटनिवडणुकीत लोकसभेचा उमेदवार कोण असेल याविषयी आताच भाष्य करणे चुकीचे ठरेल. शेतकऱ्यांच्या मुद्यावर आग्रही असलेले नाना पटोले हे २००८ मध्ये काँग्रेस सत्तेत असताना आमदार पदाचा आणि आता भाजप सत्तेत असताना याच मुद्यावरून खासदार पदाचा राजीनामा देणारे बहुधा ते पहिले लोकप्रतिनिधी असावेत.