मंत्रिपद न मिळाल्याने पटोलेंचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 11:28 PM2017-12-09T23:28:24+5:302017-12-09T23:28:36+5:30
स्वस्त लोकप्रयिता, स्वार्थाचे राजकारण करण्यासाठी व गोडगोड बोलून वेळ काढून नेणारे नाना पटोले यांना फक्त आणि फक्त मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, असल्याचा आरोप आमदार बाळा काशीवार यांनी केला. साकोली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : स्वस्त लोकप्रयिता, स्वार्थाचे राजकारण करण्यासाठी व गोडगोड बोलून वेळ काढून नेणारे नाना पटोले यांना फक्त आणि फक्त मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला, असल्याचा आरोप आमदार बाळा काशीवार यांनी केला. साकोली येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.
आ. काशीवार यांनी, पटोले हे पूर्वी काँगे्रसमध्ये होते. तेव्हाही ते आमदार होते. मात्र काँग्रेसचे सरकार शेतकरी हिताचे नाही, असा आरोप करीत त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. फक्त राजीनामे देऊन जनतेची कामे होत नाही. ती करवून घ्यावी लागतात. पटोले हे साडेतीन वर्षे खासदार होते. या कारकीर्दीत त्यांनी एकही विकासाचे काम केले नाही.
गोसेखुर्द येथील प्रकल्पाचे कामासाठी निधीची गरज होती. सदर प्रकल्प हे केंद्राअंतर्गत येत असल्याने त्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्याचे काम हे पटोलेचे होते. मात्र त्यांनी गोसेखुर्द प्रकल्पाविषयी काहीच प्रयत्न केले नाही. साकोली तालुक्यातील भेल प्रकल्प रखडलेला आहे. मात्र या प्रकल्पाकडेही पटोले यांनी कधी लक्ष दिले नाही.
या साडेतीन वर्षाच्या कारकीर्दीत एकही विकासात्मक कामे केली नाही. फक्त गोडगोड बोलून व जनतेला खोट्या भुलथापा देऊन वेळ काढून नेली. आता २०१९ मध्ये पुन्हा लोकसभेच्या निवडणुका येणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे मतदारासमोर मते मागायला विषयच उरला नाही. परिणामी आपला पराजय होईल या भितीमुळेच व भाजप सरकारणे त्यांना मंत्रीपद दिले नाही. यामुळे त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. पटोलेच्या राजीनाम्यामुळे भाजपाला काहीच फरक पडणार नाही, असे आ. काशीवार म्हणाले.
या पत्रपरिषदेला नगराध्यक्ष धनवंता राऊत, उपाध्यक्ष तरूण मल्लाणी, सभापती लखन बर्वे, जि.प. सदस्य नेपाल रंगारी, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, लाखनी तालुका अध्यक्ष पद्माकर बावनकर, नगरसेवक रवि परशुरामकर यांच्यासह नगरपरिषदेचे सभापती सर्व नगरसेवक व साकोली, लाखनी व लाखांदूर येथील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.