दमदार पावसामुळे रस्त्यांची 'पोलखोल'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:35 PM2018-07-18T23:35:29+5:302018-07-18T23:35:53+5:30
जिल्ह्यात गत चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांची पोलखोल झाली असून रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गत चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांची पोलखोल झाली असून रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
चुलबंद नदीपुलावरील खड्ड्यांची दुरूस्ती कधी ?
साकोली : हैदराबाद -साकोली राज्यमार्ग असलेल्या चुलबंद नदीवरील पूलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागात अनेकदा निवेदन व तक्रारी देण्यात आल्यात. नागरिकांच्या जीवाशी संबंधित बांधकाम विभाग खेळ करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
साकोलीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कुंभली येथील चुलबंद नदीवर अनेक वर्षांपासून पुल आहे. या पुलावरून साकोली-लाखांदूर, वडसा, हैदराबाद पर्यंतची वाहतूक सुरू असते. या पुलावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. या पुलावरून वाहन चालविताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. एवढेच नाही तर प्रसंगी जीव मुठीत ठेऊन वाहन चालवावे लागते. या खड्यामुळे पुलावर अनेकदा अपघात घडून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. तरीही बांधकाम विभाग या खड्ड्याकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत आहे.
वैनगंगा पुलावरील खड्डयातील सळाखी कुजल्या
तुमसर : पूल सुरक्षतेला शासन प्रथम प्राधान्य देण्याची हमी देते, परंतु तुमसर-गोंदिया रस्त्यावरील माडगी शिवारातील वैनगंगेवरील पूलावरील लोखंडी सळाखी उघड्या पडल्या आहेत. सद्यस्थितीत त्या कुजल्या आहेत. पूलावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. महत्त्वपूर्ण राज्यमार्गावरील पूलाकडे सातत्याने दुर्लक्ष करणे सुरू आहे.
तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर माडगी शिवारात वैनगंगा नदी पूलावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी पूलाच्या सळाखी उघड्या पडल्या आहेत. लोखंडी सळाखी असलेल्या खड्यात पाणी साचल्याने सळाखी कुजल्या आहेत. सदर खड्डयातून पाणी पूलात जात आहे. हा क्रम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. पूलावरील रस्त्याची दुरूस्ती केव्हा होणार, असा प्रश्न येथे पडला आहे. भरधाव वाहने खड्डयात उसळून येथे अनेक अपघात झाले आहेत.
पूलावर खचकेसुद्धा पडले आहेत. येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने डांबर टाकून ते कमी करण्याचा केविलवाना प्रकार केला आहे. पूलावरून जड वाहने गेल्यावर पूल कंपन होते. पूलात स्प्रींग व बेअरींग असल्याची माहिती आहे. परंतु या तांत्रिक साहित्यांची दुरूस्ती व तपासणी, सर्व्हिसींग केली नाही, अशी माहिती आहे. या पूल बांधकामाला किमान ५५ ते ५७ वर्षे झाली आहेत. अनेक पूर पूलाखालून गेले असून पूलाच्या खांबाजवळ रेतीसाठा नाही. त्यामुळे पूलाला धोक्याची शक्यता नाकारता येत नाही.
पालांदूरच्या मुख्य रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण
पालांदूर : गावचे रस्ते गावाचा चेहरा सांगतात. चेहऱ्यावरून जशी शरीराची ओळख पटते तशी रस्त्यावरून त्या गावाची विकासनशील ओळख पुढे येते. रस्त्याशिवाय विकास अशक्य आहे. पालांदुरचे राजकीय मंडळी गाव विकासाकडे पाठ फिरविल्याने गावची शान खड्यातून बाहेर येत आहे. गावातील मुख्य दोन्ही रस्त्यांवर खड्यांची चाळण झाल्याने वाहतूक प्रभावित झाली आहे.पालांदूर हे लाखनी तालुक्यातील विकसनशील राजकीय गाव म्हणून ख्यातीप्राप्त आहे. आमदार, खासदारांची नेहमीच वर्दळ पालांदूरात असतेच. मार्केटिंगच्याही क्षेत्रात तालुक्यानंतर पालांदूरचाच नंबर लागतो. शैक्षणिक क्षेत्रातही जिल्ह्यातील विद्यार्थी येथे शिक्षणाला येतात. अशा वैभवशाली गावातील अंतर्गत रस्ते खड्ड्यांनी खच्च भरले असल्याने गाव खड्ड्यांचे अशी ओळख होत आहे. बाजार चौक ते संजयनगर पर्यंतचा सुमारे दोन कि़मी.चा रस्त्याची दूरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा बाजार वसले आहे. व्यापाºयांनी थेट नाल्यावर अतिक्रमण करून ग्रामपंचायतच्या अधिकारावर आकम्रण केले आहे. आधीच अरूंद रस्ते त्यात गटार नाल्यावरील अतिक्रमण चिंतनीय आहे. पावसाचे दिवस सुरू असल्याने वाहन चालवताना समस्या उद्भवत आहे. वाहने चालवावी कसे, असे प्रश्न रस्त्यावरून चालताना पडतात.
वैनगंगेवरच्या पूलावर खड्डे पडले असून ते अत्यंत धोकादायक आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे दुरूस्ती करावी. मागील अनेक महिन्यापासून हे खड्डे आहेत. पूलाची रिपेरिंग करणे गरजेचे आहे. प्रवाशांच्या जीवाला येथे धोका आहे.
-इंजि. विपील कुंभारे, युवा काँग्रेस नेते, तुमसर माडगी.
ग्रामपंचायत कमिटीला विश्वासात घेऊन नेमका खर्चाचा अंदाज घेऊन योग्य काय करता येईल यावर विचार करून तात्काळ खड्डे भरले जातील.
-जितेंद्र कुरेकार, सरपंच पालांदूर.