१२३५ गावकारभाऱ्यांसाठी आज मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:35+5:302021-01-15T04:29:35+5:30
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४६८ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी ५२६ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती राहणार आहे. १५७८ मतदान ...
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ४६८ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी ५२६ मतदान केंद्राध्यक्षांची नियुक्ती राहणार आहे. १५७८ मतदान अधिकारी आणि ४४८ चतुर्थश्रेणी कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ५१२ पोलीस कर्मचारी मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणार आहेत. १४८ ग्रामपंचायतीच्या १२३६ जागांसाठी २७४५ उमेदवार रिंगणात आहेत. गत दहा दिवसांपासून निवडणुकीने गावातील वातावरण चांगलेच तापले होते. मतमोजणी १८ जानेवारी रोजी संबंधित तालुका निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने निर्देशित केलेल्या ठिकाणी होणार आहे.
बॉक्स
तालुकानिहाय ग्रामपंचायती
तुमसर १८
मोहाडी १७
भंडारा ३५
पवनी २७
लाखनी २०
साकोली २०
लाखांदूर ११
बॉक्स
पोलीस बंदोबस्त
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक शांततेत व सुव्यवस्थेत पार पडावी, यासाठी ५१२ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात तुमसर तालुक्यात ६३, मोहाडी तालुक्यात ५७, भंडारा १२३, पवनी ८८, साकोली ६८, लाखनी ७३, लाखांदूर ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या नेतृत्वात चोख बंदोबस्त राहणार आहे.
बॉक्स
सकाळी ७.३० पासून मतदान
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी मतदानाला सकाळी ७.३० वाजेपासून प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील दोन लाख ११ हजार १९१ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात १ लाख ८ हजार ८५ पुरुष तर १ लाख ४ हजार २१२ महिला मतदारांचा समावेश आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल.
बॉक्स
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर खबरदारीची उपाययोजना घेण्यात आली आहे. मास्क लावून येणे बंधनकारक करण्यात आले असून, सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.
बॉक्स
सोमवारी निकाल
जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मोजणी संबंधित तालुक्याच्या ठिकाणी केली जाणार असून, प्रशासनाने मतमोजणीची तयारी केली आहे.
कोट
निवडणूक निर्णय अधिकारी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पोलिंग पार्टी रवाना झाली आहे. निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्याचा प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कोणतीही अडचण नाही. तालुकानिहाय मतदानाचे नियोजन करण्यात आले असून, कोरोना संसर्गासंदर्भात उपाययोजना करण्यात आली आहे.
- शिवराज पडोळे,
निवडणूक निर्णय अधिकारी, भंडारा