वैद्यकीय तपासणी करूनच मतदान अधिकारी रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:29 AM2021-01-15T04:29:57+5:302021-01-15T04:29:57+5:30
मोहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. मतदान अधिकारी गुरुवारी सकाळी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहचले आहेत. तत्पूर्वी ...
मोहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. मतदान अधिकारी गुरुवारी सकाळी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर पोहचले आहेत. तत्पूर्वी सर्व मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांची तहसीलमध्ये तपासणी करण्यात आली. ज्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांची प्रकृतीबाबत संशय आला अशा १८ जणांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यांच्या जागी राखीव मतदान अधिकाऱ्यांना पथकासोबत पाठविण्यात आले. मोहाडी तालुक्यात एकही संवेदनशील केंद्र नाही.
मतदान केंद्रावर मास्क, निर्जंतुक द्रव्य तसेच मतदारांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. दहा कर्मचाऱ्यांचे राखीव पोलीस बल तैनात करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक, होमगार्ड असे १४२ कर्मचारी मतदान केंद्रावर नजर ठेवण्यासाठी नेमण्यात आले आहेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये ४२ मतदान केंद्र आहेत. एक खासगी शाळा मतदान केंद्रासाठी तर दोन अंगणवाड्या मतदान केंद्रासाठी घेण्यात आल्या आहेत.
मतमोजणी १८ जानेवारी तहसील कार्यालयात करण्यात येणार आहेत. मतमोजणी १० वाजता सुरु करण्यात येणार आहे. सहा टेबलावर मतमोजणी होणार आहे. एका वेळी दोन ग्रामपंचायतीचे निकाल हाती येणार आहे.