प्रदूषण नियंत्रण कार्यालय 'आॅक्सिजन'वर

By admin | Published: June 7, 2015 12:41 AM2015-06-07T00:41:35+5:302015-06-07T00:41:35+5:30

भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी भंडारा येथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण ...

Pollution control office 'Oxygen' | प्रदूषण नियंत्रण कार्यालय 'आॅक्सिजन'वर

प्रदूषण नियंत्रण कार्यालय 'आॅक्सिजन'वर

Next

अधिकाऱ्यांचे पद रिक्त
माहिती देण्यास टाळाटाळ
भंडारा : भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी भंडारा येथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयातील कारभार वाऱ्यावर आहे. कार्यालयातील प्रमुखाचेच पद रिक्त असल्याने कुणीही काही माहिती देण्यास सक्षम नाही. यामुळे मात्र दोन्ही जिल्ह्यातील उद्योगांवर विभागाचे वचकच राहिलेला नाही.
वाढत चाललेल्या कॉक्रीटच्या जंगलामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. शिवाय मानव आपल्या सुविधांसाठी जंगलांचा ऱ्हास करीत आहे. यात उद्योगांची भर पडत चालली असून उद्योगांमुळे वातावरणात प्रदूषण पसरत आहे. प्रदूषण ही आजची सर्वात गंभीर समस्या म्हणून तोंड वर काढत आहे. वाढत्या प्रदूषणावर आळा बसविणे आज सर्वात महत्वाची बाब झाली आहे. या प्रदूषणावर आळा बसावा म्हणून झाडे लावण्याचा संदेश दिला जात आहे. मात्र उद्योगांतून मोठ्या प्रमाणात पसरत चाललेल्या प्रदूषणावर आळा घालणे हे सुद्धा तेवढेच गरजेचे झाले आहे.
उद्योगांतून पसरत चाललेल्या प्रदूषणाच्या या प्रकारावर नजर ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत आहे. यात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी भंडारा येथे कार्यालय आहे. येथूनच भंडारा व गोंदियातील उद्योगांवर नजर ठेवली जाते व त्यांना वारंवार सूचना दिल्या जातात. मात्र आजघडीला या कार्यालयातील कारभारच प्रदूषीत झाला आहे. स्थानांतरणाच्या धोरणामुळे होते ते निघून गेले व त्यांच्या जागी मात्र अद्याप अधिकारी आलेच नसल्याचे चित्र आहे. परिणामी कार्यालयाचा कारभारच वाऱ्यावर आला आहे.
कार्यालयात दोनच दिवसांपूर्वी रुजू झालेले फिल्ड आॅफीसर के.पी.पुसदकर, एक लिपीक व एक शिपाई कार्यरत आहेत. अशात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उद्योग, यातील किती उद्योगांतून प्रदूषण निर्माण होत आहे, दोन्ही जिल्ह्यातील प्रदूषणाची पातळी याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळू शकली नाही. एक तर पुसदकर नव्याने रूजू झाले आहेत. त्यामुळे कार्यालय तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा नवा असून त्यांच्याकडे माहिती नाही. शिवाय त्यांच्याकडे अद्याप अधिकृतपणे उप विभागीय अधिकाऱ्यांचा प्रभार देण्यात आलेला नसल्याने त्यांचे हात बांधले असल्याचे कार्यालयातूनच बोलले जात आहे. वाहनांची संख्या वाढल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. प्लॉस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही या प्लॉस्टिकचा वापर खुलेआम सुरू आहे. प्रदूषणाच्या अनेक समस्या असताना प्रदूषण मंडळाची कारवाई बोटावर मोजण्याइतकेच आहे.(नगर प्रतिनिधी)

उद्योगांवर वचक कुणाचा?
उद्योगांतून होत असलेल्या प्रदूषणावर नजर ठेवून त्यांना यावर आवर घालण्यासाठी विभागाकडून सूचना दिल्या जातात. मात्र आजघडीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालयच आॅक्सिजनवर असल्याने अशात भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील उद्योगांसाठी रान मोकळे आहे. कुणीही दखल घेणारा नसल्याने उद्योगांतून पालन करावयाच्या सूचनांचा भंग करून मनमर्जीने काम करण्याचा प्रकार टाळता येणार नाही. अशात कार्यालयातील कारभार सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी अगोदर अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरावयास हवी.
पाचपैकी दोन जागा रिक्त
भंडारा येथील कार्यालयाचे उप विभागीय अधिकारी भड यांचे सांगली येथे स्थानांतरण झाले. त्यानुसार ते १८ मे रोजी सांगलीला निघून गेले. कार्यालय प्रमुखाचे हे पद असल्याने लगेच त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी येणे अपेक्षीत होते. मात्र आजपर्यत त्यांच्या जागेवर दुसरे अधिकारी आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे पद रिक्त आहे. या शिवाय कार्यालयात दोन फिल्ड आॅफीसर, एक लिपीक व एक शिपाई एवढे कर्मचारी आहेत. यातही पुसदकर हे चंद्रपूरहून आले असून फिल्ड आॅफीसरचे दुसरे पद रिक्त आहे. चंद्रपूरवरून तीनच दिवसांपूर्वी आल्याने पुदसकर हे सुद्धा काही माहिती देण्यात असमर्थ आहेत.

Web Title: Pollution control office 'Oxygen'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.