शहरातील रस्त्यांवर खड्डे नव्हे तलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 06:00 AM2019-09-18T06:00:00+5:302019-09-18T06:00:54+5:30
भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे.
संतोष जाधवर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात झालेल्या अतिवृष्टीने नगरपरिषदेच्या रस्त्यांचे पितळ उघडे पडले असून शहरातील एकही रस्ता खड्डेमुक्त दिसत नाही. शहरातील प्रमुख रस्त्यांवर तर एवढे मोठे खड्डे पडले आहे की, त्याला तलावाचे स्वरुप आले आहे. पावसामुळे या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहनधारकांसोबत नागरिकही चांगलेच मेटाकुटीला आले आहे.
भंडारा शहरासह जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाला. गत पंधरा दिवसात पडलेल्या पावसाने भंडारा शहरातील रस्त्यांची दैनावस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्ते आता केवळ नावाला उरले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. एक खड्डा चुकवला की दुसऱ्या खड्ड्यात वाहन जात असून यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा रस्ता त्रिमूर्ती चौक ते मुस्लिम लायब्ररी चौक हा होय. या रस्त्यावर जिल्हा बँकेच्या जवळ साधारणत: चार फुट रुंद खड्डा पडला आहे. रात्रीच्या अंधारात वाहनधारकांना हा खड्डा दिसत नाही. त्यामुळे वाहन उसळत आहेत. मुस्लिम लायब्ररी ते कॉलेज मार्गावर रस्ता नावालाच उरला आहे. या मार्गावरून विद्यार्थ्यांसह अर्ध्या शहरातील नागरिक जाणे येणे करतात. परंतु डागडुजीकडे अद्यापही कुणाचे लक्ष नाही.
त्रिमूर्ती चौक ते बसस्थानक या रस्त्यावरही मोठाले खड्डे पडले आहेत. वाहनांची येथे सतत वर्दळ असते. पहिल्या दिवशी लहान असलेला खड्डा दुसºया दिवशी मोठा झालेला दिसतो. शास्त्री चौक ते खांबतलाव चौक मार्गावरील रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. राजीव गांधी चौक परिसरात रस्ता निर्माणाधिन असून या भागात मोठाले खड्डे पडलेले आहेत. शहरातील सामाजिक न्याय भवनापासून शासकीय वसाहत मार्गे बसस्थानकाकडे जाणारा रस्ता तर अक्षरश: तलावाचे स्वरुप घेऊन आहे. मातीने माखलेल्या या रस्त्यावरून जाताना कुणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. किसान चौक ते देशबंधू वॉर्डाकडे जाणाºया रस्त्यावर तलावच दिसत आहे. पावसाचे पाणी यात साचून राहते. जिल्हा परिषद चौक ते गणेशपूर रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. नवीन वसाहतीतील रस्त्याबाबत तर विचारायचीही सोय नाही. अनेक वाहनधारक आपली वाहने बाहेर दूर ठेवून चिखल तुडवत घरी जाताना दिसतात. नगरपरिषदेने या रस्त्यांची डागडुजी तात्काळ करावी अशी मागणी आहे.
रस्त्यांची डागडुजी केव्हा?
शहरातील प्रमुख मार्ग खड्ड्यांनी व्यापले आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती केव्हा केली जाणार असा साधा सरळ प्रश्न नागरिक करीत आहेत. नगरपरिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतु अद्याप नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणत्याच उपाययोजना केल्याचे दिसत नाही. सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी खड्ड्यांमध्ये तात्पुरता का होईना मुरुमाचा भराव तरी टाकावा अशी मागणी होत आहे.
गणेश उत्सवातही डागडुजीकडे दुर्लक्ष
शहरात गणेश स्थापनेपासून गणेश विसर्जनापर्यंत दहा दिवस उत्सव साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी गणेशाची स्थापना करण्यात आली होती. बाप्पांचे आगमन खड्डेमय रस्त्यावरून झाले आणि विसर्जन मिरवणुकही खड्डेयुक्त रस्त्यावरूनच काढावी लागली. गणेशोत्सवाच्या काळात नगरपरिषद या रस्त्यांची डागडुजी करेल अशी अपेक्षा होती, मात्र नगरपरिषदेने उत्सवाच्या काळातही डागडुजीकडे दुर्लक्ष केले. सतत पाऊस पडत असल्याने डागडुजीत अडथळा आल्याचे नगरपरिषद आता सांगत आहे. परिणामी रस्त्यांवर खड्डे आहेत.
बसस्थानकात खड्ड्यांचे साम्राज्य
जिल्हा मुख्यालय असलेल्या बसस्थानकालाही खड्ड्यांनी सोडले नाही. बसस्थानकाच्या आवारात पाच ते सात फुटापर्यंतचे खड्डे पडले आहेत. सतत पाऊस पडत असल्याने या खड्ड्यात पाणी साचते. भरधाव बस आली की खड्ड्यांतील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते. त्यामुळे बाहेरगावी जाणाºया नागरिकांची कोंडी होते. बसस्थानकात दररोज शंभरावर बससेचे आवागमन होते. शहरासह जिल्हाभरातील नागरिक येथे बाहेरगावी जाण्यासाठी येतात. मात्र येथील खड्ड्यांनी मनस्ताप सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत आहे.