पाथरी येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:36 AM2021-07-31T04:36:06+5:302021-07-31T04:36:06+5:30
पाथरी हे चुलबंद काठावरील गाव आहे. पुराचे पाणी सुद्धा गावात शिरते. यातून मार्ग काढण्याकरता या चिखलमय रस्त्यातून वाट शोधावी ...
पाथरी हे चुलबंद काठावरील गाव आहे. पुराचे पाणी सुद्धा गावात शिरते. यातून मार्ग काढण्याकरता या चिखलमय रस्त्यातून वाट शोधावी लागते. या रस्त्याच्या दुरुस्ती करिता गत दोन वर्षापासून शासन-प्रशासनाकडे गावातील तरुणांनी व स्थानिक पुढाऱ्यांनी विचारणा केलेली आहे. यावर नेहमीप्रमाणे ठरलेले उत्तर हो, आता नक्की करूच ! असे मिळते. मात्र रस्त्याला न्याय मिळालाच नाही.
चुलबंद खोरा असल्याने येथील शेती सदाबहार आहे. वर्षभर शेतकऱ्यांसह गावकऱ्यांना याच मार्गाने प्रवास करावा लागतो. रात्री-बेरात्री गावात आजारी पडलेल्या व्यक्तीला साध्या मोटारसायकलने नेता येत नाही. शाळकरी मुलांचे तर विचारता सोय नाही, अशी अवस्था रस्त्याची झालेली आहे. एखादे वाहन समोरून गेल्यास निश्चितच कपडे खराब केल्याशिवाय राहत नाही. खराशी ते पाथरी मार्गावरील नरव्हा फाट्याजवळून गावात येणारा एक किलोमीटरचा रस्ता संपूर्णतः चिखलात गेला आहे.
गत चार सहा महिन्याच्या पूर्वी गावाच्या बाहेरून मरेगाव पर्यंत रस्ता तयार करण्यात आला. तोच काम गावातून नरव्हा फाट्यापर्यंत केला असता तर किती चांगले झाले असते, अशी प्रतिक्रिया गावकरी देत आहेत.
चौकट
गावच्या ग्रामपंचायतने या रस्त्यावर स्वतःच्या अधिकारातून हजारो रुपये खर्च केलेला आहे. मात्र रस्ता मोठा व खर्च अधिक असल्याने ग्रामपंचायतला झेपावले नाही. तरी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम, गिट्टीचा आधार देत रस्ता सुधारण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांसह ट्रॅक्टरची वाहतूक मोठी असल्याने रस्ता जागोजागी फुटला. या रस्त्याला मोठ्या निधीची गरज असून बांधकाम विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
कोट
बांधकाम विभागाकडे या रस्त्याच्या अनुषंगाने निवेदन दिलेले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांना सुद्धा लेखी निवेदन देत रस्त्याचे वास्तव रूप कळविले आहे. जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनात नियोजन करणार असल्याचे सांगितले आहे. रस्ता लवकरात लवकर दुरुस्त होणे गावची गरज आहे.
तुळशीदास फुंडे, सरपंच, पाथरी