केंद्रीय पथकाने जाणून घेतल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:46 AM2018-05-18T00:46:18+5:302018-05-18T00:46:18+5:30
खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या पथकाने गुरूवारला भंडारा तालुक्यातील परसोडी, तुमसर तालुक्यातील बिनाखी, मोहाडी तालुक्यातील आंधळगाव व पालडोंगरी गावाला भेट देऊन शेतकºयांशी चर्चा केली.
या भेटीत राज्याचे कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विजयकुमार, विभागीय आयुक्त अनुपकुमार उपस्थित होते. केंद्राच्या या पथकात नागपूरचे संचालक डॉ.आर.पी. सिंग, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोईमतूर विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ.ए. एच. प्रकाश, उपायुक्त एस. सेल्वराज, खर्च विभागाचे सल्लागार दिनानाथ, केंद्रीय विद्युत अधिकारिता विभागाचे उपसंचालक ओमप्रकाश सुमन, दिल्लीचे मत्स्य संशोधन अधिकारी डॉ.तरूणकुमार सिंग, इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ राईस रिसर्चचे संचालक एस.आर. वोलेटी यांचा समावेश होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, उपविभागीय अधिकारी प्रविण महिरे, स्मिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी लोखंडे, तहसिलदार संजय पवार व गजेंद्र बालपांडे उपस्थित होते.
परसोडी येथे केंद्रीय पथकाने भेट देऊन ग्रामपंचायत भवनात शेतकऱ्यांशी संवाद साधला. तुडतुड्यामुळे झालेल्या धानाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकास माहिती दिली. धान पिकाचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. राज्य शासनाने केंद्राकडे मदतीसाठी निधीचा प्रस्ताव पाठविला असून त्या अनुषंगाने पथक तपासणीसाठी आल्याचे पथकातील अधिकाºयांनी सांगितले. शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वापरणे गरजेचे असल्याचे पथकाच्या सदस्यांनी सूचविले. येणाऱ्या हंगामात शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे वापरावे, असे आवाहन केले. त्यानंतर बिनाखी, आंधळगाव व पालडोंगरीला भेट देऊन तुडतुडाग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीचा सकारात्मक अहवाल केंद्र शासनाला सादर करणार असल्याचे त्यांनी शेतकºयांना सांगितले.